INDIA Alliance Morcha on Election Commission: विरोधकांच्या इंडिया आघाडीकडून सोमवारी दिल्लीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला विरोधी पक्षातील तब्बल 300 खासदार उपस्थित होते. नव्या संसद भवनापासून या मोर्चाला सुरुवात झाली. मात्र, काही अंतर चालल्यानंतर संसदेच्या मकरद्वाराजवळ पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी हा मोर्चा अडवला. इंडिया आघाडीच्या खासदारांना निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाता येऊ नये म्हणून याठिकाणी प्रचंड फौजफाटा लावण्यात आला होता. मात्र, इंडिया आघाडीच्या खासदारांना याठिकाणी लावलेल्या बॅरिकेटसवर चढून पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. इंडिया आघाडीच्या अनेक महिला आणि पुरुष खासदारांनी बॅरिकेटसवर चढून केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात घोषणा दिल्या.
या सगळ्या गदारोळात उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव हे पोलिसांचा डोळा चुकवून बॅरिकेटवर चढले. याठिकाणी पोलिसांनी तीन-चार बॅरिकेटसची रांग करुन एक कुंपणच तयार केले होते. मात्र, अखिलेश यादव पोलिसांना चकवून बॅरिकेटसवर चढले. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते शिताफीने बॅरिकेटसची रांग ओलांडून पलीकडे गेले. मात्र, त्यानंतर अखिलेश यादव यांना पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले. यानंतर अखिलेश यादव यांनी इंडिया आघाडीच्या खासदारांसह रस्त्यावरच बसकण मारत ठिय्या आंदोलन सुरु केले.
पोलीस आणि शीघ्र कृती दलाच्या तुकड्या तैनात करुन केंद्र सरकारने एकही खासदार संसदेच्या आवारातून बाहेर पडणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली होती. मात्र, विरोधकांनी घोषणबाजी करुन हा संपूर्ण परिसर दणाणून सोडला. पोलिसांचा फौजफाटा लावल्यावर विरोधी खासदार लवकर माघार घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र, इंडिया आघाडीच्या खासदारांनी जोरदार संघर्ष करत बॅरिकेटस चढून जाण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी गाडी बोलावून इंडिया आघाडीच्या खासदारांना एक-एक करुन आतमध्ये कोंबायला सुरुवात केली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
आणखी वाचा