India Air Force New Video : भारतीय हवाई दलाने (India Air Force) मंगळवारी 20 मे रोजी एक नवा व्हिडिओ शेअर करत आपली युद्धसिद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. भारतीय हवाई दलाने हा व्हिडिओ 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. या थरारक व्हिडिओसह प्रसिद्ध कलाकार पीयूष मिश्रा यांचे 'आरंभ है प्रचंड है' हे गीत ऐकायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये भारतीय हवाई दलाच्या अलीकडील मोहिमा, धोरणात्मक प्रगती आणि राष्ट्रीय सुरक्षेबाबतची कटिबद्धता दाखवण्यात आली आहे.

भारतीय हवाई दल नेहमीच दृढ निश्चयाने प्रतिसाद देते, असा संदेश या व्हिडिओमध्ये देण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय हवाई दलाने आपली आकाशातील वर्चस्व राखण्याची क्षमता दाखवली असून, त्यासाठी "अदृश्य, अडथळारहित, अतुलनीय" आणि "चपळ, प्राणघातक, गतिमान" अशा प्रकारच्या प्रभावी घोषवाक्यांचा वापर करण्यात आला आहे.

दरम्यान, रविवारी भारतीय नौदलाने एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात "धैर्य आमचं दिशा दर्शक आणि कर्तव्य आमचं मार्गदर्शक आहे. #IndianNavy सदैव सज्ज आहे, शांततेची सुरक्षा करण्यासाठी आणि सर्व धोके नष्ट करण्यासाठी," असा उल्लेख करण्यात आला होता. या पोस्टसोबत एक थरारक व्हिडिओ देखील होता, ज्यामध्ये महान हिंदी कवी रामधारी सिंह दिनकर यांच्या कालातीत शब्दांचा समावेश होता. दिनकरांची ही कविता मूळतः महाभारत युद्धापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी कौरवांना दिलेल्या इशाऱ्याचे काव्यरूप आहे. ही कविता संवादातून कृतीकडे होणाऱ्या निर्णायक संक्रमणाचे प्रतीक आहे आणि भारताच्या सध्याच्या रणनीतिक आणि लष्करी भूमिकेशी ती सखोलपणे सुसंगत आहे.

12 मे रोजी झालेल्या डीजीएमओ (DGMO) पत्रकार परिषदेत, व्हिडिओ सादरीकरणामध्ये रामधारी सिंह दिनकर यांच्या "याचना नहीं" या कवितेचा वापर का करण्यात आला, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर एअर मार्शल ए. के. भारती यांनी रामायणमधील एक द्विपदी सादर करत उत्तर दिलं होतं. "विनय न मानत जलधि जड़, गये तीन दिन बीती।बोले राम सकोप तब, भय बिनु होय न प्रीती।", या उदाहरणातून त्यांनी सूचित केलं होतं की, जेव्हा नम्र विनंतीला प्रतिसाद मिळत नाही, तेव्हा कठोर भूमिका घेणे आवश्यक ठरते. 

आणखी वाचा 

पाकिस्तानने अणवस्त्र हल्ल्याची धमकी दिली होती का? संसदीय समितीसमोर विक्रम मिस्रींनी दिलं उत्तर