Independence Day 2025 PM Narendra Modi Speech: स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावर ठणकावले, देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि काही नव्या योजना जाहीर केल्या. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पंतप्रधान मोदी यांनी ‘मिशन सुदर्शन चक्र’ची देखील त्यांनी घोषणा केली आहे.
PM मोदींकडून 'मिशन सुदर्शन चक्र'ची घोषणा
स्वातंत्र्य दिनानिमित्ताने लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी देशाच्या सुरक्षेबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सुदर्शन चक्र मोहिमेची घोषणा केली आहे. ही एक शक्तिशाली शस्त्र प्रणाली असेल, ती केवळ शत्रूच्या हल्ल्याला निष्प्रभ करेलच असे नाही तर अनेक पटींनी प्रत्युत्तर देखील देईल, असे त्यांनी सांगितले. येत्या 10 वर्षांत ती पुढे नेली जाईल. ही संपूर्ण आधुनिक प्रणाली, तिचे संशोधन, विकास आणि उत्पादन देशातच केले जाईल. ही एक अशी प्रणाली असेल जी युद्धाच्या पद्धतीनुसार भविष्यातील शक्यतांची गणना करून विकसित केली जाईल. ती अतिशय अचूक असेल. या सुदर्शन चक्राद्वारे देखील आपण अचूक शस्त्रे विकसित करण्यात पुढे जाऊ असा विश्वास व्यक्त करत देशातील महत्त्वाच्या ठिकाणांवर ही प्रणाली कार्यरत असणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींचे ऑपरेशन सिंदूरबाबत वक्तव्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत वक्तव्य केलंय. ते म्हणाले की, आजचा दिवस एक विशेष महत्त्वाचा दिवस आहे. मला खूप अभिमान वाटतोय की, लाल किल्ल्वरून मला ऑपरेशन सिंदूरमधील वीर जवानांना सलाम करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या वीरांनी अशा प्रकारे हे क्षण घडवले की, ते कल्पनेपलीकडचं होतं. ही घटना अशी होती की, पहलगाममध्ये सीमा पारून आलेल्या अतिरेक्यांनी मोठ्या प्रमाणावर नरसंहार केला. लोकांचा धर्म विचारून, ओळखून त्यांची हत्या केली गेली. संपूर्ण हिंदुस्थान या घटनेनंतर संतापलेला होता. आपल्या सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं गेलं. पाकिस्तानमध्ये जे काही घडलं, त्याचा परिणाम इतका प्रचंड होता की, आजही रोज नवनवे खुलासे होत आहेत," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात स्पष्ट शब्दांत सांगितले की पाकिस्तानातील नुकसानीबाबत अजूनही नवनवीन माहिती समोर येत आहे. भारत गेल्या अनेक दशकांपासून दहशतीला तोंड देत आला आहे. देशाच्या छातीत अनेकदा खंजीर खुपसला गेला. मोदी म्हणाले, "आतंक आणि त्याला पाठींबा देणाऱ्यांना आम्ही आता वेगळं मानत नाही. हे सर्व मानवतेचे शत्रू आहेत." त्यांनी हेही स्पष्ट केलं की भारत आता अणुशक्तीच्या धमक्यांना सहन करणारा देश राहिलेला नाही. जर भविष्यातही कोणी भारताच्या सुरक्षिततेशी खेळण्याचा प्रयत्न केला, तर "सेना आपल्या अटींवर, आपल्या वेळेनुसार, लक्ष्य साध्य करेल," असा ठाम इशारा त्यांनी दिला.
आणखी वाचा