नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उद्या (15 ऑगस्ट) लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकावून देशाला संबोधित करतील. लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकावण्याची ही त्यांची सलग दहावी वेळ. याआधी जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, मनमोहन सिंह या तीनच पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरुन किमान दहा वेळा तिरंगा फडकावला आहे. पंतप्रधान मोदी यांचा या यादीत समावेश होईल. हा मान मिळवणारे ते पहिलेच बिगर काँग्रेसी पंतप्रधान असतील.
2014 पासून प्रत्येकवेळी लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी हे काही ना काही महत्त्वाच्या घोषणा करत आले आहेत. यावेळी तर 2024 च्या निवडणुकीआधीचं त्यांचं शेवटचं भाषण असणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीने ते कुठली महत्त्वाची घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.
2014 पासून आतापर्यंत पंतप्रधानांच्या लाल किल्ल्यावरच्या भाषणांचा इतिहास काय सांगतो यावर नजर टाकूया.
लाल किल्ल्यावरुन आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घोषणा
2014 - लाल किल्ल्यावरच्या या पहिल्या भाषणात मोदींनी स्वत:चा उल्लेख प्रधान सेवक केला. स्वच्छ भारत योजनेची घोषणा याच भाषणात झाली, मेक इन इंडियाचाही उल्लेख
2015 - जनधन योजनेची घोषणा या भाषणात, स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया
2016 - या वर्षी कुठली महत्वाची योजना तर जाहीर नाही झाली, पण मोदींनी भाषणात बलुचिस्तानचा उल्लेख केला, पाकिस्तानच्या दडपशाहीचा जाहीर निषेध केला
2017 - प्रत्येक गरिबाला पक्कं घर मिळवून देण्यासाठीची घोषणा
2018 - आयुषमान भारत योजनेची घोषणा लाल किल्ल्यावरुन झाली
2019 - चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाची घोषणा या भाषणात
2020 - व्होकल फॉर लोकल हा मंत्र मोदींनी या भाषणात दिला
2021 - गतिशक्ती योजनेची घोषणा, देशाच्या कानाकोपऱ्याला जोडणाऱ्या वंदे भारत ट्रेनचीही घोषणा
2022 - स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातलं हे भाषण, 2047 पर्यंत भारताला सशक्त करण्यासाठी विकासाचे पंचप्राण काय यावर मोदींनी भाष्य केलं.
लाल किल्ल्यावरच्या भाषणासाठी जनभागीदारी योजनेअंतर्गत वेगवेगळ्या क्षेत्रातील सामान्य लोकांनाही आमंत्रित करण्याची परंपरा मोदी सरकारने सुरु केली आहे. उद्या असे 1800 आमंत्रित असतील, ज्यात 400 सरपंच, वेगवगेळ्या सरकारी योजनांचे लाभार्थी, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातले 50 कामगार यांचा समावेश असेल. प्रत्येक राज्यातून त्यांच्या पारंपरिक पोषाखात बोलावलेली एकूण 75 जोडपीही या कार्यक्रमाचं आकर्षण असतील.