Independence Day 2023 : देश यंदा स्वातंत्र्याची 76 वर्ष पूर्ण करणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात स्वातंत्र्यदिनाचा (Independance Day) उत्साह सध्या पाहायाल मिळत आहे. देश यंदा 77 वां स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. मंगळवार 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सकाळी 7 वाजता दिल्लीतील लाल किल्ल्यावर (Red Fort) ध्वजारोहण करणार आहेत. तसेच त्यानंतर ते देशाला संबोधित देखील करणार आहेत. स्वातंत्र्यदिवसामुळे संपूर्ण लाल किल्ल्यावर कडेकोट बंदोबस्त देखील करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांना लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थिती लावता नाही येणार. पण तरिही तुम्ही घरबसल्या स्वातंत्र्यदिनाचा संपूर्ण कार्यक्रम पाहू शकता.
असा असणार संपूर्ण कार्यक्रम
15 ऑगस्ट 1947 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी लाल किल्ल्यावर पहिल्यांदा अभिमानाने तिरंगा फडकवला. तेव्हापासून पंतप्रधानांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ध्वाजारोहण करण्याची परंपरा सुरु झाली जी आजतागायत सुरु आहे. उद्याही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाल किल्ल्यावर सकाळी 7 वाजता ध्वजारोहण करण्यात येणार असून नंतर राष्ट्रगीत म्हटले जाणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाल किल्ल्यावरुन संपूर्ण देशाला संबोधित करणार आहेत. तसेच यावेळी सशस्त्र दल आणि दिल्ली पोलिसांकडून पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात येते. 21 तोफांची तिरंग्याला सलामी देऊन राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
सुरक्षा यंत्रणा सतर्क
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाल किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरात कडोकोट सुरक्षा करण्यात येते. यासाठी अनेक मार्ग बंद केले जातात तर अनेक मेट्रो स्थानके देखील बंद ठेवण्यात येतात. लाल किल्ल्यावर लोकांची मोठी गर्दी जमा होते. त्यामुळे अनेकदा काही घातपात होण्याची देखील शक्यता असते. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये सुरक्षा यंत्रणा देखील सतर्क असते. तसेच संपूर्ण देशभरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे होणार थेट प्रक्षेपण
लाल किल्ल्यावरील ध्वाजारोहणाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार आहे. त्यामुळे हा संपूर्ण कार्यक्रम प्रेक्षण घरी बसून देखील पाहू शकतात. या संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण हे दूरदर्शनवर करण्यात येणार आहे. तसेच एबीपी माझावरही तुम्ही या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. दोन्ही वाहिन्यांवर या संपूर्ण कार्यक्रमाचे लाई्व्ह प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे जरी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहता नाही आला तरी तुम्ही घरी बसून हा कार्यक्रम पाहू शकता.