Independence Day 2022 : देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष झालीत पण अजूनही आपल्या देशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था (Samagra health scheme ) पाहिजे त्या प्रमाणात सुधारली नसल्याचं चित्र आहे. ग्रामीण भागात तर आरोग्य व्यवस्था न सांगितलेली बरी....! आपल्या देशाची लोकसंख्या जवळपास 140 कोटींच्या घरात पोहोचली आहे. अशातच इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या मानाने सार्वजनिक आरोग्य व्यवस्था तोकडी असल्याचं आपल्याला गेल्या अडीच वर्षाच्या कोरोना काळात दिसून आलं. अनेक ठिकाणी रुग्णालये नसल्याने तर कुठे रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल झालेत. गेल्या अडीच वर्षात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेनं आपल्याला सर्व काही शिकविले आणि यातून धडा घेऊन केंद्र सरकारने आता सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत अमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे.


स्वातंत्र्य दिनी आरोग्य योजनेची घोषणा होण्याची शक्यता


आपण सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. त्यामुळे यावेळी स्वातंत्र दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणातून देशातील जनतेसाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत मैलाचा दगड ठरणारी एक नवीन आणि मोठी आरोग्य योजना जाहीर करण्याची शक्यता आहे. "समग्र स्वास्थ्य योजना" असं या योजनेचं नाव असून ही योजना देशातील नागरिकांना उत्तम आणि दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्याबद्दल आहे.


नेमकी कशी असेल "समग्र स्वास्थ्य योजना?


यापूर्वी देशात केंद्र सरकारकडून अनेक आरोग्य योजना नागरिकांसाठी सुरू आहेत. पंतप्रधान जन आरोग्य योजना (PM - JAY ) , आयुष्यमान भारत डिजिटल मिशन ( ABDM ) , पंतप्रधान आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन ( PM- ABHIM ) अशा योजनांच्या माध्यमातून जनतेला सार्वजनिक आरोग्य केंद्रातून आरोग्य व्यवस्थेचा लाभ मिळत असे. पण आता या सर्व योजना नवीन असलेल्या " समग्र स्वास्थ्य योजनेत" विलीन करून जनतेला मोठ्या वैद्यकीय संस्थेत किंवा रुग्णालयात उत्तम आणि दर्जेदार आरोग्य सुविधा अत्यंत माफक किंवा विनामूल्य मिळणार असल्याने ही योजना देशातील जनतेला फायद्याची ठरणार आहे.


नाविन्यपूर्ण अशी नवीन योजना.


या नवीन आरोग्य योजनेत अनेक वैशिष्ट्ये आहेत आणि पैकी एक म्हणजे "वैद्यकीय पर्यटन" ( Medical Tourism ). शासकीय पातळीवर केंद्र सरकारने ही संकल्पना पहिल्यांदाच या योजनेत समाविष्ट केली आहे. आपल्या देशात जगातील इतर कुठल्याही देशापेक्षा अत्यंत कमी दरात वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातात मग ते शासकीय असो व खाजगी. जस इतर देशात अपेंडिक्स किंवा हर्निया या शस्त्रक्रियेसाठी 3 लाखांपर्यंत खर्च येतो तोच आपल्या देशात 40 ते 50 हजार रु इतक्या कमी खर्चात अगदी छोट्या शहरात देखील या शस्त्रक्रिया होतात. त्यामुळे इतर देशातील असे रुग्ण आपल्या देशात वैद्यकीय सुविधा घेण्यासाठी यावे याकरिता सरकारने या योजनेत अनेक नवीन गोष्टींचा समावेश केला आहे. त्यामुळे इतर देशातील रुग्ण आपल्या देशात वैद्यकीय पर्यटनासाठी देखील येतील आणि त्याचा फायदा देशाला होईल.


या योजनेमुळे डॉक्टर्स आणि तज्ञांना सुद्धा फायदा...! 


समग्र स्वास्थ्य योजनेमुळे देशातील तज्ञ आणि हुशार डॉक्टरांना सुद्धा फायदा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. देशातील तज्ञ आणि हुशार डॉक्टरांना आपलं शस्त्रक्रियेचं आणि आरोग्य उपचारांचं कौशल्य दाखविण्यासाठी वेगवेगळ्या देशातील रुग्णालयात पाठविले जाणार असून त्यादेशात आपल्या देशातील आरोग्य उपचारच कौशल्य माहिती मिळेल. यामुळं त्या देशातील रुग्ण साहजिकच उपचार घेण्यासाठी आपल्या देशाकडे वळतील अशी भावना या योजनेच्या माध्यमातून समोर येत आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून नवीन आरोग्य योजना आपल्या देशातील जनतेला व संपूर्ण जगभरातील नागरिकांना एक अमृततुल्य ठरो अशी अपेक्षा करूयात....!