Independence Day 2022 : देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Independence Day) साजरा केला जात आहे. आज सकाळी साडेसात वाजता पंतप्रधान मोदींनी (PM Modi) दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं. स्वातंत्र्य दिनाच्या 75 वर्षांच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 वेळा लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावला आणि देशाला संबोधित केलं. यावेळी मोदींनी 82 मिनिटांचं भाषण केलं. दरम्यान, देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असताना संपूर्ण देशभरात अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी ट्वीट करून सर्व देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही दिल्या.


राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर देशाला संबोधित करताना मोदी म्हणाले की, "आज भारताचा राष्ट्रध्वज जगाच्या कानाकोपऱ्यात अभिमानानं फडकतोय. आजचा दिवस ऐतिहासिक आहे. नवीन संकल्प आणि नव्या जोमानं पावलं उचलण्याचा आजचा दिवस आहे. गुलामगिरीचा संपूर्ण काळ स्वातंत्र्याच्या लढ्यात घालवला आहे. भारताचा असा एकही कोपरा नाही, जिथे लोकांनी शेकडो वर्ष गुलामगिरीविरुद्ध लढा दिला नाही. असा एकही भाग नाही जिथे, लोकांनी स्वातंत्र्यासाठी आपलं आयुष्य वेचलं नाही, त्याग केला नाही. आज सर्व देशवासियांना प्रत्येक महापुरुषांना अभिवादन करण्याची संधी आहे. त्यांची स्वप्नं पूर्ण करण्याची प्रतिज्ञा घेण्याची ही संधी आहे."


अभिमानानं फडकतोय तिरंगा : पंतप्रधान मोदी


देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, "आज भारताचा तिरंगा जगाच्या कानाकोपऱ्यात अभिमानानं फडकतोय."


नव्या संकल्पानं नव्या दिशेनं वाटचाल करण्याचा दिवस : पंतप्रधान 


देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "या स्वातंत्र्यदिनी मी सर्व भारतीयांना आणि भारतावर प्रेम करणाऱ्यांना शुभेच्छा देतो. नव्या निर्धारानं नव्या दिशेनं वाटचाल करण्याचा दिवस आहे."


मंगल पांडे, भगतसिंह, सुखदेव यांचा देश आभारी आहे : पंतप्रधान


मंगल पांडे, तात्या टोपे, भगतसिंह, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, अशफाकुल्ला खान, राम प्रसाद बिस्मिल आणि ब्रिटीश राजवटीचा पाया हादरवणाऱ्या आपल्या असंख्य क्रांतिकारकांचा देश कृतज्ञ आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :