पणजी : गोव्यात समुद्रातील पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्यानं मोठ्या लाटा उसळून किनाऱ्यावरील शॅकमध्ये पाणी घुसल्यानं मोठं नुकसान झालं आहे. उत्तर गोव्यातील कांदोळी, कळंगुट, केरी, आश्वे किनाऱ्यांवर याचा फटका बसला आहे. यामुळे शॅक मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
रविवारी समुद्र किनाऱ्यावरील शॅक्सच्या किचनमध्ये पाणी घुसल्याने दैनंदिन वापरासाठी आणलेले काही पदार्थ वाहून गेले. यावेळी शॅक्स चालकांना लाकडी पलंग, खुर्च्या वाचवण्यासाठी बरीच धावपळ करावी लागली.
या पर्यटन हंगामातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी ‘ओखी’ वादळावेळी असेच नुकसान झालं होतं. समुद्राच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्यानं आश्वे-मांद्रे किनारी भागात वरपर्यंत पाणी आलं होतं.
दरम्यान, नेमकी कोणत्या कारणामुळे समुद्रातील पाण्यात वाढ झाली याचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, यामुळे किनाऱ्यावरील शॅक आणि रेस्टॉरंटचे बरेच नुकसान झाले आहे.