बनवारीलाल पुरोहित यांचा माफीनामा
मॅडम पत्रकार,
तुम्ही 18 एप्रिल 2018 रोजी केलेला ईमेल मिळाला. तुम्ही मला पत्रकार परिषद संपल्यानंतर एक प्रश्न विचारला होता. तो खूप चांगला प्रश्न होता. तुम्ही मला माझ्या नातीसारख्या वाटलात. त्यामुळेच मी तुमचे गाल थोपटले. मी स्वतः 40 वर्ष पत्रकारिता केलेली आहे. त्यामुळे आपल्या पत्रकारितेचे कौतुक करण्याचा माझा हेतू होता. मात्र झाल्या प्रकाराने तुम्ही दुःखी झाल्याचं तुमच्या ईमेलवरुन समजलं. आपल्या भावना दुखावल्या असल्यास मी आपली माफी मागतो.
बनवारीलाल पुरोहित
राज्यपाल, तामिळनाडू
काय आहे प्रकरण?
तामिळनाडूच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या सेक्स फॉर डिग्री प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यासाठी तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती.
यावेळी 78 वर्षीय राज्यपाल पुरोहित यांना त्यांच्याजवळ उभ्या असलेल्या लक्ष्मी सुब्रमण्यम या महिला पत्रकराने प्रश्न विचारला.
पण प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी पुरोहित यांनी त्या महिला पत्रकाराच्या संमतीविना तिच्या गालाला स्पर्श केला आणि गाल थोपटले. राजभवनात बोलवलेली ही पत्रकार परिषद आटोपून ते निघत असताना ही घटना घडली. यावेळी त्यांच्याभोवती पत्रकारांचा गराडा होता.
लक्ष्मी सुब्रमण्यम ‘द वीक’मध्ये काम करतात. या घटनेनंतर लक्ष्मी यांनी ट्विट करुन “मी बनवारीलाल पुरोहित यांना प्रश्न विचारला त्यावर त्यांनी उत्तर देणे अपेक्षित होते. पण त्यांनी उत्तर देण्याऐवजी माझे गाल थोपटले”, असं म्हटलं होतं.
‘डिग्रीसाठी सेक्स’प्रकरणी पत्रकार परिषद
राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी तामिळनाडूच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या सेक्स फॉर डिग्री प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यासाठी, काल पत्रकार परिषद घेतली.
सध्या तामिळनाडूत देवांग आर्ट्स कॉलेजमधील प्राध्यापिका निर्मला देवी प्रचंड वादात आहेत. या महिला प्राध्यापिकेने आपल्या विद्यार्थिनींना जास्त गुण आणि पैशाच्या बदल्यात, ‘अधिकाऱ्यांसोबत अॅडजस्ट’ करण्याचा सल्ला दिला होता.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन, या महिला प्राध्यापिकेला अटक केली आहे.
मात्र देवांग आर्ट्स कॉलेजमधील प्रोफेसर निर्मला देवी यांनी आपण राज्यपालांच्या जवळचे असल्याचा दावा केला होता. महत्त्वाचं म्हणजे राज्यपाल असलेले बनवारीलाल पुरोहित हे याच विद्यापीठाचे कुलपती आहेत.
मात्र त्यांनी या महिला प्राध्यापिकेशी कोणताही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. मी आरोपी महिला प्राध्यापिकेचा चेहराही पाहिलेला नाही, असा दावा राज्यपालांनी केला आहे.