नवी दिल्ली : भारतीय लष्करात गौरवशाली परंपरा असलेल्या अश्वदलाबाबत लवकरच एक महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. या दलात आता घोड्यांऐवजी टँकचा वापर केला जावा असा प्रस्ताव समोर आल्यानं लष्करात घोड्यांच्या वापराची प्रथा बंद होण्याची शक्यता आहे. लष्कराचे वाढते खर्च कमी करणे आणि त्यांची युद्धशक्ती वाढवणे याबाबत नेमण्यात आलेल्या समितीनं यासंदर्भातली शिफारस आपल्या अहवालात केली आहे.

केवळ उत्सवी महत्व या युनिटला राहिलेलं आहे, त्यामुळे ते बंद करण्यात यावं असही या अहवालात म्हटलं आहे. पण या निर्णयाला लष्कराचे अनेक निवृत्त अधिकारी विरोध करतायत. ही गौरवशाली परंपरा बंद पडू नये अशी चिंता अनेकांच्या बोलण्यातून व्यक्त होतेय. 61 घोडदळ युनिटचं मुख्यालय जयपूर इथे आहे. जयपूर आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणी या अश्वदलाची युनिट आहेत.

लष्कराच्या गौरवशाली परंपरेचं प्रतीक म्हणून तर या घोडदळाकडे पाहिलं जातंच, पण क्रीडा क्षेत्रातही त्यांचं मोठं योगदान आहे. एक पद्मश्री, 10 अर्जुन पुरस्कार विजेते, 11 एशियन गेम्स मेडल या अश्वदलानं दिली आहेत. शिवाय पोलो वर्ल्डकपमध्येही अनेकदा भारतानं अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक परेडमध्येही या अश्वदलाचा सहभाग असतो. त्यामुळे ही अश्वदलाची परंपरा बंद करण्याच्या प्रस्तावावर नाराजीचा सूर उमटतोय. कालबाह्य होतंय म्हणून जर हे बंद करत असाल तर ते टँक या घोड्यांऐवजी दिले जातायत तेही आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कालबाह्यच होतायत असं निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी म्हटलं आहे.

उलट घोड्यावरुन गस्त घालणं हे टँकवरुन गस्तीपेक्षा अधिक स्वस्त आणि सुलभ असल्याचा दावा त्यांनी केला. ऑपरेशन पराक्रममध्ये राजस्थानाच्या वाळवंटात या युनिटनं यशस्वी कामगिरी केली आहे असंही त्यांनी म्हटलं. ऑक्टोबर 1953 मध्ये जयपूरमध्ये लष्करातल्या या घोडदळाची स्थापना झाली होती. इतिहास आणि आधुनिकता यांना जोडणारा दुवा असल्यानं त्याचं जतन आवश्यक असल्याचं तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता याबाबत नेमका काय निर्णय होतो हे पाहणं औत्सुक्याचं असेल.