नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर देशभर 3 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. या दरम्यान ई-कॉमर्स कंपन्यांना सरकारने मोठा झटका दिला आहे. ई कॉमर्स कंपन्यांना 20 एप्रिलपासून जीवनावश्यक वस्तूंशिवाय इतर वस्तूंच्या विक्रीस सरकारने परवानगी दिली होती. मात्र रविवारी सरकारने यूटर्न घेत जीवनावश्यक वस्तू वगळता इतर वस्तूंच्या विक्रीला परवानगी नाकारली आहे. या वस्तूंची विक्री लॉकडाऊननंतर करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाने रविवारी ट्वीट केलं की, लॉकडाऊन दरम्यान ई कॉमर्स कंपन्यांद्वारे जीवनावश्यक वस्तू वगळता इतर वस्तूंच्या विक्रीवरील बंदी कायम असणार आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे. ई-कॉमर्स कंपन्यांनी जीवनावश्यक वस्तू वगळता इतर वस्तूंची विक्री सुधारित आदेशात काढून टाकली आहे. या आदेशात नमूद केले आहे की, ई-कॉमर्स कंपन्यांशी संबंधित तरतुदी ज्या त्यांच्या वाहनांना आवश्यक परवानगीसह प्रवास करण्याची परवानगी दिली होती, त्या मार्गदर्शक सूचनांमधून काढल्या जात आहेत.
लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यानंतर केंद्र सरकारनं 15 एप्रिलला काही नव्या गाईडलाईन्स जारी केल्या होत्या. या गाईडलाईन्समध्ये केंद्र सरकारने ई-कॉमर्स कंपन्यांना सवलत दिली होती. त्यानंतर अनेक ठिकाणी मोबाईल, टीव्ही, फ्रीज यासारख्या वस्तूंची ऑनलाईन विक्री ई-कॉमर्स कंपन्या करताना दिसत होत्या. याला छोट्या व्यापाऱ्यांच्या संघटनेनं आणि काही राजकीय पक्षांनाही विरोध केला होता. त्यानंतर आता केंद्र सरकारनं हा सुधारित आदेश जारी केला आहे.
नव्या आदेशानुसार ई-कॉमर्स कंपन्यांना दिलेली ही सवलत आता मागे घेण्यात आली आहे. खरंतर सरकारनं चार दिवसांपूर्वी सर्व राज्यांसाठी ज्या गाईडलाई्न्स काढल्या होत्या, त्यात ई कॉमर्स कंपन्यांना केवळ जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करता येणार आहे की इतरही वस्तूंची हे स्पष्ट नमूद नव्हतं. या संदिग्धतेमुळे काही राज्यांत ई-कॉमर्स कंपन्या ऑनलाईन टीव्ही, फ्रीज सारख्या उपकरणांची विक्री सुरु होताना दिसत होती.
त्यामुळे छोट्या दुकानदारांनी मात्र नाराजी व्यक्त केली होती. आता सरकारनं हा निर्णय मागे घेतल्यानंतर या संघटनांनी सरकारच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. देशात 20 एप्रिलपासून काही ठराविक क्षेत्रांमध्ये, ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक नाही, तिथे सवलती मिळणार आहेत. त्यात ई कॉमर्स कंपन्यांना मात्र आता 3 मे पर्यंत केवळ जीवनावश्यक वस्तूंचीच विक्री करता येणार आहे.
Lockdown 2 | प्रीपेड ग्राहकांसाठी गुडन्यूज, प्रीपेड ग्राहकांची वैधता 3 मेपर्यंत वाढवली