पणजी : गोव्यात ड्रग्सची पाळे-मुळे आता खोलवर रुजू लागली आहेत. बाहेरुन ड्रग्स आणून गोव्यात विकला जात होता. मात्र आता चक्क आपल्या घराच्या आसपास ड्रग्सची शेती करण्यापर्यंत या व्यवसायात गुंतलेल्यांची मजल गेली आहे. उत्तर गोव्यात हे प्रकार वाढीस लागले आहेत. क्राइम ब्रांचने आज असाच प्रकार उघडकीस आणून एका युवकाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
आपल्या बंगल्या बाहेरच्या बागेत गांजाची लागवड करणाऱ्या ख्रिस्तोफर मायकल पेटिन्सन या युवकाला पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केली आहे. लागवड केलेला साडेतीन लाख रुपयांचा गांजाही जप्त केला आहे. हा गांजा तो व्यावसायिक तत्वावर पिकवत होता.
संशयिताचे वडील ब्रिटीश नागरिक असून गोव्यातील महिलेशी त्यांचा विवाह झाला होता. संशयित ख्रिस्तोफरचा जन्मही गोव्यातच झाला आहे. ख्रिस्तोफर ड्रग्सचा व्यवहार करीत असल्याचा संशय पोलिसांना होता. तशी माहितीही पोलिसांना मिळाली होती. निरीक्षक राजन निगळये आणि राहूल परब यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करून पोलिसांनी पुराव्यांसह संशयिताला अटक केली.
संशयिताने आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. दरम्यान गांजा लागवडीच्या घटना राज्यात बऱ्याच ठिकाणी उघडकीस येवू लागल्या आहेत. यापूर्वी कळंगूट येथे छापा मारून क्राईम ब्रँचने एका फ्लॅटमध्ये करण्यात आलेली गांजा लागवड उघडकीस आणली होती.