Narendra Modi : आज 30 जानेवारी, महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. सत्य आणि अहिंसा यांचे प्रेरणास्त्रोत अशी गांधीजींची ओळख आहे. या वर्षातील पहिल्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांना अभिवादन केलं. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, आज आपले पूज्य बापू, महात्मा गांधीजी यांची पुण्यतिथी आहे. 30 जानेवारी हा दिवस आपल्याला बापूंच्या शिकवणीचे स्मरण देतो. काही दिवसांपूर्वीच आपण प्रजासत्ताक दिनही साजरा केला. दिल्लीमध्ये राजपथावर आपल्या देशाचे शौर्य आणि सामर्थ्य यांची झलक दर्शवणारे चित्ररथ पाहून सर्वांच्या मनात उत्साह आणि अभिमान दाटून आला. एक बदल आपण पाहिला असेल आता प्रजासत्ताक दिन सोहळा 23 जानेवारी म्हणजे नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती दिनी सुरु होईल आणि 30 जानेवारीपर्यंत म्हणजे गांधीजींच्या पुण्यतिथीपर्यंत सुरु राहील.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देशाला संबोधित केलं. मन की बातच्या माध्यमातून त्यांनी संवाद साधला. आज मन की बात कार्यक्रमाच्या वेळेत बदल करण्यात आला होता. दरवेळी सकाळी 11 वाजता होणारा मन की बात कार्यक्रम आज 11.30 वाजता पार पडला. 'मन की बात' मधून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केलं. 2022 मधील पहिल्या मन की बात कार्यक्रमात त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला. भ्रष्टाचार ही देशाला लागलेली कीड आहे असं म्हणत आपण सगळे मिळून प्रयत्न केल्यास ही कीड नष्ट होऊ शकतं, असं ते म्हणाले.
2014 पासून सतत करत आहेत 'मन की बात'
पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात केली होती. ऑक्टोबर 2014 मध्ये मोदींनी मन की बातची सुरुवात केली होती. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवार मन की बातद्वारे संवाद साधत असतात. आज 84 वी मन की बात आहे. या कार्यक्रमाचं पहिलं प्रसारण 3 ऑक्टोबर 2014 साली झालं होतं. त्यानंतर प्रत्येक महिन्याला पंतप्रधान या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांसोबत अनेक मुद्द्यावर चर्चा करतात.