Weather Updates : देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठे उन्हाचा चटका जाणावत आहे, तर कुठे अवकाळी पाऊस पडत आहे. काही भागात पडलेल्या पावसामुळं उष्णतेपासून दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा एकदा देशात तापमानाचा (Temperature) पारा वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. सध्या देशाच्या राजधानीसह अनेक भागात तापमान हे 40 अंशाच्या पुढे गेलं आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत देशातील अनेक भागात तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं काही भागात तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर काही भागात मुसळधार पावसाचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. 


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण आठवडाभर देशातील बहुतांश राज्यांमध्ये हवामान स्वच्छ राहणार आहे. तसेच 13 मे रोजी देशाच्या अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. मात्र त्यामुळं तापमानात घट होणार नाही. तापमानत वाढ होणार असल्यानं नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. 


राजस्थानसह यूपीमध्ये तापमानाचा पारा वाढणार


राजस्थानमध्येही येत्या काही दिवसात हवामान कोरडे राहणार आहे. तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअस वाढ होण्याची दाट शक्यता आहे. काही भागात कमाल तापमान 42 ते 44 अंशांपर्यंत नोंदवले जाऊ शकते. तर उत्तर प्रदेशमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत राज्यात हळूहळू उष्मा वाढ होणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. आज (11 मे) आणि  उद्या (12 मे) रोजी राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


'या' राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज 


हवामान विभागानं काही भागात अवकाळी पावसाची शक्यता देखील वर्तवली आहे. देशातील आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि ओडिशामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या राज्यांमध्ये मोचा चक्रीवादळाचा धोका आहे. बंगालच्या उपसागरातून उठणारे हे वादळ तीव्र होत आहे. यामुळे या राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे वादळ आणखी तीव्र होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. वादळाची परिस्थिती पाहता हवामान विभागाने मच्छिमारांसह जहाजे आणि लहान बोटींना आग्नेय बंगालच्या उपसागरात न जाण्यास सांगितले आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Delhi Rain : मान्सूनपूर्व काळात दिल्लीत सरासरीपेक्षा अधिक पाऊस, कमाल तापमानातही वाढ