Weather Updates : देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climete change) होत आहे. सध्या केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. मात्र, सर्वच ठिकाणी अद्याप पावसानं हजेरी लावली नाही. देशातील काही भागात सध्या उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. तर काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशमध्ये कडक उन्हाने लोकांना हैराण केले आहे. येत्या आठवडाभरातही उष्णतेचा प्रकोप कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे.


जून महिन्याच्या सुरुवातीला काही भागात झालेल्या पावसामुळं लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. तरी गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट कायम आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज कमाल तापमान 43 अंश आणि किमान तापमान 27 अंश राहण्याचा अंदाज आहे. यासोबतच दिवसभर जोरदार उष्ण वारे वाहण्याची शक्यता आहे. तर यूपीमध्येही आज कमाल तापमान 41 अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.


या भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता 


देशातील बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेशमध्ये पुढील तीन ते चार दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मात्र, त्यानंतर तापमानात घट होऊ शकते. सध्या मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे अनेकांना उन्हापासून दिलासा मिळाला आहे.


या भागात जोरदार पावसाची शक्यता


भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार केरळ, कर्नाटक, गोवा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय बिपरजॉय चक्रीवादळामुळे अनेक राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. विभागानुसार, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, लक्षद्वीप, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि अंदमान-निकोबार, सिक्कीममध्ये हलका पाऊस पडू शकतो.


चक्रीवादळामुळे राजस्थानमध्येही विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील चुरू, सीकर, नागौर, जयपूर, भरतपूर येथे पावसाची शक्यता विभागाने व्यक्त केली आहे. याशिवाय 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहतील.


या भागात बर्फ पडण्याची शक्यता


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरमध्ये हिमवृष्टी आणि हलका पाऊस सुरू राहील. बर्फवृष्टी आणि पावसामुळे आज उत्तराखंडमध्येही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील चमोली, रुद्रप्रयाग, उत्तरकाशी येथे मुसळधार पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय ताशी 70 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Biparjoy Cyclone : बिपरजॉयचं संकट! येत्या 12 तासांत चक्रीवादळाची तीव्रता वाढणार, महाराष्ट्रासह 'या' राज्यांना धोका