मुंबई :  आयआयटी पवई यंदाच्या पदवीदान कार्यक्रमासाठी खादी कपड्यांचा वापर करणार आहे. आयआयटी पवईचे संचालक डॉ. देवांग खाखर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''नव्या पिढीमध्ये राष्ट्रवादाचे विचार रुजवण्यासाठी खादीचा 'राष्ट्रीय प्रतिक' म्हणून वापर करण्यात येणार आहे.'' या कार्यक्रमासाठी संस्थेने 3500 खादी कपड्यांची ऑर्डर दिली असल्याचे समजते.


 

पदवीदान कार्यक्रमासाठी खादीचा वापर कारण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींना केंद्रस्थानी ठेऊन घेण्यात आल्याचे सुत्रांकडून समजते.

 

दरम्यान, केंद्र सरकार राष्ट्रीय शैक्षणिक संस्थांचे भगवेकरण करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप सातत्याने होत आहे.  तर दुसरीकडे गुजरात तंत्रज्ञान विद्यापीठानेही नुकतेच विद्यार्थ्यांसाठी खादीचा वापर बंधनकारक केले आहे. त्या पार्श्वभूमीवर पदवीदान कार्यक्रमासाठी आयआयटीने हा निर्णय घेतल्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

 

दरम्यान, यावरून मनुष्यबळ विकास मंत्रपालयाने खादी वापरासंदर्भात कोणालाही सुचना केल्या नसल्याचे स्पष्ट केले आहे.

 

पण, जुलै 2015मध्ये यूजीसीने एक अध्यादेश काढून शैक्षणिक संस्थांमधील सांस्कृतिक कार्यक्रमात पारंपरिक कपड्यांचा तसेच हातमागावर बनवण्यात आलेल्या कपड्यांचा वापर करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानुसारच गुजरात विद्यापीठानेही यासाठी विशेष सरक्यूलर काढून विद्यार्थ्यांना खादी वापर बंधनकारक केले असल्याचे बोलले जात आहे.