नवी दिल्ली : राजधानी एक्स्प्रेसमधील प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणी एसी क्लासने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. कारण जर राजधानी एक्स्प्रेसमधील प्रथम आणि द्वितीय एसी कोचचं तिकीट कन्फर्म नसेल, तर त्या प्रवाशांना विमान सेवेचा पर्याय मिळणार आहे.


पण विमान तिकीट आणि रेल्वेच्या तिकीटामधील अंतर प्रवाशाला द्यावं लागणार आहे.

एअर इंडियाचे माजी संचालक अश्विनी लोहानी यांनी गेल्या वर्षी याबाबतचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला दिला होता. पण त्यावेळी रेल्वे मंत्रालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. पण सध्या अश्विनी यांच्याकडेच रेल्वे मंत्रालयाचं संचालक पदी आहेत. त्यामुळे एअर इंडियाकडून असा प्रस्ताव पुन्हा सादर झाल्यास, त्याला तत्काळ मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

अशा प्रकारच्या प्रस्तावामुळे प्रवाशांना आपल्या इच्छित ठिकाणी लवकरात लवकर पोहोचणं शक्य होणार आहे.

वास्तविक, राजधानी एक्स्प्रेसमधील प्रथम श्रेणी एसीचा तिकीट दर आणि विमानाचा तिकीट दरात जास्त फरक नाही.

दरम्यान, एअर इंडियाचा खासगीकरण करण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळे एअर इंडियाकडून असा प्रस्ताव पुन्हा रेल्वे मंत्रालयाला देण्यात येईल की नाही, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.