नवी दिल्ली : देशात कोरोनाचे आकडे (India Corona Update) काही दिवसांपासून कमी होताना दिसत आहेत. दुसरीकडे शासकीय स्तरावर कोरोना लसीकरणाचा (Corona vaccination) वेग वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीसंदर्भात जनजागृती देखील केली जात आहे. आता या लसीच्या प्रभावासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे.  भारतीय संशोधन अनुसंधान संस्था म्हणजेच आयसीएमआरनं (ICMR) लसींच्या परिणामकारकतेसंदर्भात एक रिसर्च केला आहे. या रिसर्चमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर व्यक्तीचा मृत्यूचा धोका 95 टक्क्यांपर्यंत कमी होतो, असं समोर आलं आहे. 


आयसीएमआरनं तामिळनाडूच्या पोलीस दलातल्या एक लाख 17 हजार 524  पोलिसांवर हा रिसर्च केला आहे. या रिसर्चदरम्यान लस घेतलेले पोलिस कर्मचारी आणि लस न घेतलेले पोलिस कर्मचारी यांच्यापैकी किती जणांचा कोरोनाने मृत्यू झाला याबद्दल निरीक्षण करण्यात आलं. आयसीएमआरनं 1 फेब्रुवारी 2021 ते 14 मे 2021 या कालावधीत हा रिसर्च करण्यात आला. 


Coronavirus Today : देशात पुन्हा एकदा दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत वाढ, गेल्या 24 तासांत 43,733 रुग्णांची नोंद


या रिसर्चसाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीचा एक डोस घेतलेले 32 हजार 792 कर्मचारी निवडण्यात आले. लसींचे दोन्ही डोस घेतलेले कर्मचारी 67673 होते तर 17059 पोलीस कर्मचाऱ्यांनी लस घेतली नव्हती. रिसर्चनुसार या कालावधीत 31 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यातील 4 जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते, तर 7 जणांनी एकच डोस घेतला होता. अन्य 20 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली नव्हती.


यामुळं या रिसर्चमधून समोर आलं आहे की, कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी लसीचे दोन्ही डोस अत्यंत परिणामकारक आहेत.  ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा एक डोस घेतला होता, त्यांना मृत्यूचा धोका 82 टक्के तर दोन्ही डोस घेतलेल्यांना हा धोका 95 टक्क्यांपर्यंत मृत्यूचा धोका  कमी होता असं समोर आलं आहे. लस न घेतलेल्यांच्या तुलनेत लस घेतलेल्यांना हा धोका अत्यंत कमी असल्याचं देखील या रिसर्चमधून समोर आलं आहे.  


धोका अद्याप टळलेला नाही, गेल्या 24 तासांत 43 हजार 733 नवे रुग्ण


देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव घटताना दिसून येत असलं तरी धोका अद्याप टळलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून देशात 40 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत होती. परंतु, आज दैनंदिन कोरोना रुग्णांचा आकडा काहीसा वाढलेला दिसत आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 43 हजार 733 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच गेल्या 24 तासांत 47,240 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 97.18 टक्क्यांवर पोहोचला आहे.  


गेल्या 24 तासांत 930 कोरोनाबाधितांचा मृत्यू 


आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल कोरोनामुळे 930 रुग्णांनी जीव गमावला आहे. त्यानंतर आतापर्यंत कोरोनामुळे 4 लाख 4 हजार 211 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.