IAS Shah Faesal : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (UPSC Exam) 2010 च्या बॅचचे टॉपर असलेले जम्मू काश्मीरमधील शाह फैजल यांनी राजीनामा दिल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र जानेवारी 2019 मध्ये राजीनामा दिलेल्या शाह फैसल यांनी प्रशासकीय सेवेत पुन्हा घरवापसी  केली आहे. फैजल यांनी तीन वर्षांपूर्वी दिलेला प्रशासकीय सेवेचा राजीनामा केंद्र सरकारने स्वीकारलाच नव्हता आणि आता त्याला पुन्हा सेवेत रुजू करुन घेण्यात आलं आहे.


कोण आहेत शाह फैसल?


शाह फैसल जम्मू-काश्मीरचे पहिले UPSC टॉपर आहेत.  
फैसल यांनी 2009  साली सिव्हिल सर्व्हिस एक्साम (Civil Service Exam)मध्ये टॉप केलं होतं. 
यानंतर शाह फैसल चर्चेत आले. 
जानेवारी 2019 मध्ये त्यांनी पदाचा राजीनामा दिला. 
त्यानंतर  शाह फैसल यांनी मार्च 2019 मध्ये नवीन प्रादेशिक राजकीय पक्षाची स्थापना केली. 
आधी डॉक्टर मग आयएएस फैसल 2009 च्या बॅचचे आयएएस टॉपर. 
आयएएस होण्याआधी शाह फैसल डॉक्टर होते. वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली आणि अव्वल क्रमांक पटकावला. 


काश्मिरी तरुणांसाठी मानला जातोय महत्वाचा निर्णय


शाह फैसल यांचा हा निर्णय काश्मिरी तरुणांसाठी महत्वाचा मानला जात आहे. फैसल UPSCत टॉप आल्यानंतर तरुणाईला नवी आशा मिळाली होती. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी काश्मीरमधील परिस्थितीला राजकारणी जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.  त्यांनी राजीनामा दिल्यानं खासकरुन काश्मिरी युवकांना धक्का बसला होता. मात्र फैसल यांनी जवळपास तीन वर्षांनी का होईना प्रशासनात परतण्याचा निर्णय घेतल्यानं कौतुक होत आहे. फैसल यांनी अलिकडच्या काळात भाजपच्या अनेक नेत्यांची ट्वीट रिट्विट केल्याचं देखील दिसत आहे. 


आपल्या राज्यातील अविनाश धर्माधिकारी यांनी देखील UPSC पास झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. सोबतच ठाण्याचे आयुक्त म्हणून काम केलेल्या चंद्रशेखर यांनी देखील राजीनामा देत तेलगू देसम पक्षात प्रवेश घेतला होता. मात्र त्यांनी पुन्हा प्रशासकीय सेवेत न येता आपलं वेगळं करिअर घडवलं. फैसल यांनी देखील पदाचा राजीनामा देत राजकीय पक्ष स्थापन केला होता. त्यांच्या या निर्णयानंतर अनेकांना धक्का बसला होता. जम्मू काश्मिरच्या तत्कालिन राज्यपालांनी देखील त्यांना प्रशासनात थांबण्याची विनंती केली होती. मात्र त्यांनी न थांबता राजकारणात नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. आता पुन्हा त्यांच्या प्रशासनात घरवापसीचं स्वागत केलं जात आहे. 


माझ्या आदर्शवादाने मला निराश केले- शाह फैसल 


फैसल शाह यांनी ट्विट केले की, 'गेल्या आठ महिन्यांत (जानेवारी 2019-ऑगस्ट 2019) मी खचून गेलो आहे, मी बर्‍याच वर्षांच्या कठोर परिश्रमातून तयार केलेले जवळजवळ सर्व काही गमावले आहे. मग ती नोकरी असो, मित्र असो किंवा प्रतिष्ठा असो. माझ्या आदर्शवादाने मला निराश केले आहे, पण मी आशा सोडलेली नाही.






'मला माझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास आहे की माझ्याकडून ज्या चुका झालेल्या आहेत त्या मी सुधारु शकतो. आयुष्य मला आणखी एक संधी नक्कीच देईल. मला मागील 8 महिने पूर्णपणे मिटवायचे आहेत. अपयश आपल्याला आणखी मजबूत बनवतात. मी आज 39 वर्षांचा झालो आहे आणि मी नवीन सुरुवात करण्यास उत्सुक आहे.