नवी दिल्ली : पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या हनीट्रॅपमध्ये वायू सेनेचा ग्रुप कॅप्टन अडकला आहे. दिल्ली पोलिसांनी 51 वर्षीय आरोपी अरुण मारवाह यांना अटक केली आहे.
आयएसआयच्या एजंटनं डिसेंबर महिन्यात फेसबुकवर तरुणीच्या नावे फेक अकाऊण्ट तयार करुन कॅप्टन मारवाह यांच्याशी संपर्क साधला. फेसबुक अकाऊंटवरुन दोघांमध्ये चॅटिंगला सुरुवात झाली. काही दिवसातच आयएसआय एजंट आणि अरुण मारवाह यांच्यातील संभाषणाने अश्लीलतेची पातळी गाठली.
पाकिस्तानच्या हनीट्रॅपमध्ये कॅप्टन मारवाह अडकले. एअरफोर्सच्या काही गोपनीय कागदपत्रांचे फोटो मारवाह यांनी व्हॉट्सअॅपवरुन आयएसआय एजंटला पाठवले. मारवाह यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे वायूसेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची तक्रार केली.
31 जानेवारीला मारवाह यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. त्यामध्ये मारवाह दोषी आढळल्याने त्यांच्यावर ऑफिशिअल्स सिक्रेट अॅक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली. अरुण मारवाह यांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे.
अरुण मारवाह यांना पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आलं असून स्पेशल सेलमध्ये पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.