जबलपूर : राहुल गांधींसारखा बालिश नेता मी आजपर्यंत पाहिला नाही, अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. राफेल कराराच्या मुद्द्यावरुन त्यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला. "केजीतील मुलांना पण अक्कल येते, मात्र राहुल गांधीना अजून अक्कल आली नाही." असंही जेटली म्हणाले.

राहुल गांधी मागील तीन महिन्यापासून दिवसात सहा वेळा खोटं बोलतात, असंही अरुण जेटली म्हणाले. त्यांनी उदाहरणादाखल एका लहान मुलाची गोष्ट सांगितली. एक मुर्ख आणि हट्टी मुलगा असतो. घरी आल्यावर त्याची आई त्याला विचारते, वर्गात बाकीच्या मुलांनी 2+2 = 4 उत्तर सांगितलं, मात्र तू 5 उत्तर दिलं. जे की चुकीचं उत्तर आहे. तू नापास होशील. त्यावर तो मुलगा म्हणाला की, मी नापास तेव्हा होईन जेव्हा मी ते खरं मानेन. ही गोष्ट सांगत अरुण जेटलींनी नाव न घेता राहुल गांधींना टोला लगावला.

पंतप्रधान मोदींनी राफेल विमान योग्य आणि कमी किमतीत घेतलं आहे, असंही जेटली म्हणाले. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात अरुण जेटलींनी पंतप्रधान मोदींची पाठराखण केली आहे. राफेल कराराबाबत बोलतानाच जेटलींनी राहुल गांधीवर टीकेचा भडीमार केला. गांधी परिवाराने कोणालाही वर येऊ दिलं नाही. ज्यांना संधी दिली त्यातील एक नरसिंहराव ज्यांच्या पार्थिवाला पक्ष कार्यालयात ठेऊ दिलं नाही. दुसरे सिताराम केसरी ज्यांना पक्षातून बाहेर काढून टाकलं. या शब्दात जेटलींनी गांधी कुटुंबीयांवर हल्लाबोल केला आहे.