चहा करता येतो, मी पंतप्रधान होऊ शकतो : आझम खान
एबीपी माझा वेब टीम | 19 Oct 2016 10:38 AM (IST)
नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे नेते आझम खान वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. खान यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मलाही चहा करता येतो, नीटनेटका पोशाख करता येतो आणि ड्रम वाजवता येतो, म्हणजे मी पंतप्रधानपदासाठी पात्र उमेदवार आहे, अशी खोचक टिपणी आझम खान यांनी केली. 'पंतप्रधान होण्यासाठी सर्व आवश्यक गुण माझ्यात आहेत. मी चहा करु शकतो, ड्रम वाजवू शकतो, जेवण बनवू शकतो आणि आकर्षक पोशाख घालू शकतो. त्याशिवाय मी इतकाही कुरुप नाही आणि भ्रष्टाचारीही नाही' असं आझम खान म्हणाले. इ-रिक्षा वितरण समारंभात ते बोलत होते. 'जर मी पंतप्रधान झालो तर सहा महिन्यात 130 कोटी जनतेच्या खात्यात मी 20 लाख रुपये जमा करेन. मी आश्वासनं मोडणाऱ्यांपैकी नाही.' असं म्हणत आझम खान यांनी मोदींनी प्रत्येक भारतीयाच्या खात्यात 15 लाख जमा करण्याच्या दिलेल्या आश्वासनावर ताशेरे ओढले.