अहमदाबाद: 'मला संसदेत बोलू दिलं जात नाही म्हणून मी सभांमध्ये बोलतो' असा थेट आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केला आहे. गुजरातमधल्या डिसामध्ये जाहीर सभेत मोदी बोलत होते. विरोधकांचा खोटारडेपणा संसदेत टिकणार नाही.. त्यामुळे विरोधक चर्चेपासून पळ काढतात. असा टोलाही मोदींनी विरोधकांना हाणला आहे.
गुजरातमध्ये डेअरी प्लांटच्या उद्घाटनासाठी मोदी उपस्थित होते. त्यावेळी बोलताना मोदींनी बोलताना विरोधकांवर टीका केली.
'नोटाबंदीविरोधात कोणताही पक्ष नाही. विरोधक फक्त या निर्णयाच्या प्रणालीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. पण राजकारणापेक्षा राष्ट्रनिती महत्वाची असते. पक्षापेक्षा देश मोठा असतो. हा त्रास फक्त 50 दिवसांपर्यंत सहन करावा लागणार आहे. त्यानंतर परिस्थिती नक्कीच सुधारेल.' असं मोदी यावेळी म्हणाले.
'छोट्या नोटा आणि छोट्या लोकांची ताकद वाढविण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला. खोट्या नोटा या दहशतवादाला खतपाणी घालतात. सीमेपलिकडे काय सुरु आहे हे सर्वांनाच माहिती आहे.' असंही मोदी म्हणाले.