हैदराबाद : मी हिंदूविरोधी नाही, फक्त मोदीविरोधी आहे, असे दाक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी म्हटले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हिंदूविरोधी असल्याचे आरोप होत होते. त्या पार्श्वभूमीवर प्रकाश राज यांनी इंडिया टुडेच्या साऊथ कॉन्क्लेव्हमध्ये या आरोपांना उत्तर दिले.
यावेळी प्रकाश राज यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्यावरही निशाणा साधला.
“मारेकऱ्यांचं समर्थन करणारा कुणीही व्यक्ती स्वत:ला हिंदू म्हणवून घेऊ शकत नाही. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर मोदी समर्थकांनी सेलिब्रेशन केलं. त्यावेळीही मोदींनी प्रतिक्रिया दिली नाही. एक खरा हिंदू कधीच अशा हत्यांचे समर्थन करणार नाही.”, असे प्रकाश राज म्हणाले.
अभिनेता प्रकाश राज हे बोलत असतानाच समोर प्रेक्षकांमध्ये बसलेले भाजप प्रवक्ते कृष्णा सागर राव यांनी विरोध केला. मात्र, प्रकाश राज यांनी त्यांनाही सौम्य शब्दात उत्तर दिले.
दरम्यान, प्रकाश राज हे नेहमीच मोदी सरकारच्या धोरणांमधील चुकांवर बोट ठेवत आणि देशातील अस्वस्थ वातावरणावर आपलं सडेतोड मत निर्भीडपणे मांडत आले आहेत. त्यामुळे अर्थातच ते भाजप समर्थकांच्या टीकेचे धनी होत असतात.