लखनऊ : चहाचा कप हातातून पडल्याने एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला घटस्फोट दिला. उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
पत्नी रुही पती मोहम्मद शब्बीरला चहा देण्यासाठी जात होती. मात्र अचानक रुहीच्या हातातून कप निसटला आणि त्यांच्या मुलाचा अंगावर गरम चहा पडला. यात तो किरकोळ भाजला.
एवढ्याशा कारणावरुन शब्बीरने तीन वेळा तलाक बोलून रुहीसोबत नातं संपवलं. इतकंच नाही तर शब्बीरने रुहीला बेदम मारहाण केली आणि घरातून हाकललं. रुही तिच्या मुलांसह सध्या माहेरी राहत आहे.
रुहीने पतीवर मारहाण आणि छळाचा आरोप केला आहे. तसंच न्यायासाठी सरकारकडे दाद मागितली आहे. दुसरीकडे पती मोहम्मद शब्बीरने त्याची चूक कबूल केली आहे. रागाच्या भरात हे कृत्य घडल्याचं त्याने सांगितलं.
देशात तीन वेळा तलाकवर मोठी चर्चा सुरु आहे. यादरम्यानच 'तलाक तलाक तलाक' म्हणून लग्न मोडण्याचा सिलसिला सुरुच आहे. महिला आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.