BSF Jawan P K Sahu: भारतीय सीमा सुरक्षा दलाचे (BSF) जवान पूर्णम कुमार शॉ यांनी काही दिवसांपूर्वी चुकून सीमारेषा ओलांडली होती आणि ते पाकिस्तानमध्ये गेले होते. मध्यंतरीच्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यात ऑपरेशन सिंदूर नंतर युद्ध (India Pak War) सुरु झाले होते. त्यामुळे पी.के. शॉ पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होते. यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधी झाल्यानंतर पी.के. शॉ यांना तब्बल 21 दिवसांनी पाकिस्तानने सोडले होते. 14 मे रोजी पी.के. शॉ पुन्हा भारतात परतले. मात्र पाकिस्तानमधील या 21 दिवसांत नेमकं काय काय घडलं?, याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पूर्णम कुमार शॉ यांचा शारीरिक छळ करण्यात आला नव्हता तर मानसिक दबावाच्या अनेक पद्धती वापरण्यात आल्या होत्या. यामुळे त्याच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे. तसेच पाकिस्तानी सैन्याने त्यांना मारहाण केली नाही. परंतु वेगवेगळ्या प्रकारे छळ करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यांना अनेक दिवस डोळ्यांवर पट्टी बांधून ठेवण्यात आलं. एवढंच नाही तर नीट झोपूही दिलं जात नव्हतं. सैनिकाला वेगवेगळ्या प्रकारे छळ करून त्यांच्याकडून भारतीय गुप्तचर माहिती मिळवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आला. दात घासण्याची किंवा मूलभूत स्वच्छता राखण्याची परवानगी नव्हती. अशा गोष्टीद्वारे मानसिक स्थिती बिघडवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आला, अशीही माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं होतं?
नियंत्रण रेषेवर शेतकऱ्यांना विशेष परवानगी देऊन शेती करायला दिला जाते. पी.के.शॉ यांना शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी फिरोजपूर येथे तैनात करण्यात आले होते. पीकांची पेरणी करताना आणि काढणी करताना बीएसएफ जवान त्यांच्या सुरक्षेसाठी व निगराणीसाठी तैनात असतात. या शेतकऱ्यांना विशेष किसान कार्डही दिले जाते. या झिरो लाईनवर फक्त खांब बसविण्यात आले असून कुंपण रेषा त्याअगोदरच आहे. 23 एप्रिलला सकाळी सकाळी शेतकरी कंबाइन घेऊन फेंसिंगवरील गेट नंबर-208/1 च्या रस्त्याने शेतातील गहू काढणीसाठी शेतकरी गेले होते. पाकिस्तानने आपल्या हद्दीत कुंपणरेषा लावलेली नाही. त्यामुळे झिरो लाईन पार करुन पी.के. शॉ ऊन्हापासून दिलासा मिळविण्यासाठी एका झाडाखाली बसायला गेले होते. मात्र, ती जागा पाकिस्तानच्या हद्दीत होती. तेवढ्यात पाकिस्तानी रेंजर्स जल्लोके बीएसएफ चेक पोस्टवर पोहोचले. त्यानंतर, त्यांनी भारतीय सैन्य दलाच्या बीएसएफचे जवान पी.के. शॉ यांना ताब्यात घेतले होते. ही गोष्ट समजल्यानंतर भारताने पी.के. शॉ यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले होते. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी तातडीने बॉर्डरवर धाव घेतली होती. मात्र, त्यावेळी पी.के. शॉ यांची सुटका होऊ शकली नव्हती.