नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शाह हेच देशाचे पंतप्रधान बनणार असून योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना बाजूला केलं जाणार असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्ममंत्री अरविंद केजरीवाल  (Arvind Kejriwal)  यांनी केला होता. त्यावरून राजकीय वातावरण तापल्यानंतर अमित शाह यांनीही प्रतिक्रिया दिली होती. आता आदित्यनाथ यांच्यासंबंधित आणखी एक माहिती उघड झाली आहे. परदेशात जाणाऱ्या शिष्टमंडळाच्या यादीतून नरेंद्र मोदी यांनी ऐनवेळी योगी आदित्यनाथ यांचं नाव काढून टाकल्याचा किस्ता वरिष्ठ पत्रकार प्रदीप सिंह यांनी सांगितला. 


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर येताच 16 मे रोजी पत्रकार परिषदेत दावा केला की जर भारतीय जनता पक्ष तिसऱ्यांदा सत्तेवर आला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी 75 वर्षांचे झाल्यावर ते अमित शाह यांना पंतप्रधान बनवतील. त्याचवेळी योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर केलं जाईल. अमित शहा पंतप्रधान होण्याच्या वाटेत योगी आदित्यनाथ हा एकमेव काटा आहे. त्यामुळे त्यांना दूर केलं जाईल असा दावा केजरीवाल यांनी केला होता. 


योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री कसे झाले?


अरविंद केजरीवाल यांच्या विधानामुळे निर्माण झालेल्या गदारोळात ज्येष्ठ पत्रकार प्रदीप सिंह यांनी योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्याची संपूर्ण कहाणी सांगितली. ते म्हणाले की, योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री करण्यासाठी 2014 मध्येच तयारी सुरू झाली होती आणि पंतप्रधान मोदींनी हा निर्णय अमित शहांना सांगितला होता. पण हा निर्णय अत्यंत गुप्त ठेवण्यात आला होता. 2017 च्या यूपी विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी एक शिष्टमंडळ कोणत्यातरी देशात जाणार होते. परंतु पंतप्रधान मोदींनी शिष्टमंडळाच्या यादीतून योगी आदित्यनाथ यांचे नाव ऐनवेळी काढून टाकले होते.


शिष्टमंडळातून योगी आदित्यनाथ यांचं नाव वगळलं


प्रदीप सिंह यांनी एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, सुषमा स्वराज त्यावेळी परराष्ट्र मंत्री होत्या. त्यामुळे परदेशात जाणाऱ्या त्या शिष्टमंडळाचे नेतृत्व कोण करणार हे विचारण्यासाठी त्या पीएम मोदींकडे गेल्या होत्या. योगी आदित्यनाथ हे त्या शिष्टमंडळाचं प्रतिनिधित्व करतील असं मोदींनी त्यांना सांगितलं होतं. पण जेव्हा पंतप्रधान कार्यालयातून शिष्टमंडळाची अंतिम यादी परत आली तेव्हा योगी आदित्यनाथ यांचे नाव काढून टाकण्यात आले होते. यूपी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याच्या चार ते पाच दिवस आधी ही गोष्ट घडली होती.


प्रदीप सिंह पुढे म्हणाले की, सुषमा स्वराज यांनी पीएम मोदींना याबद्दल विचारले. योगीजींचे नाव तुम्हीच दिले होते आणि तुम्हीच ते नाव हटवल्याचं सुषमा स्वराज्य यांनी विचारलं. त्यानंतर पंतप्रधान म्हणाले की उत्तर प्रदेशमध्ये योगीजींची गरज आहे. परंतु त्यांना मुख्यमंत्री बनवण्याचा विचार केला जात असल्याचे त्यांनी सुषमा स्वराज्य यांना सांगितले नाही. 


सन 2014 मध्ये एका अनौपचारिक संभाषणात अमित शाह म्हणाले होते की 2017 च्या विधानसभा निवडणुकीत योगीजी मुख्यमंत्री होतील. ज्या अमित शाह यांनी योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनवायचे होते, ते त्यांना का हटवतील? असा सवाल प्रदीप सिंह यांनी विचारला.