मुंबई  : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना महिन्याला 2 लाख 9 हजार रुपये पगार मिळतो. शिवाय त्यांना सहाय्यक कर्मचारी देखील देण्यात आलेला नाही. माहिती अधिकारामध्ये रिझर्व्ह बँकेने ही माहिती दिली.


उर्जित पटेल यांनी सप्टेंबरमध्ये पदभार स्वीकारला. त्यापूर्वी ते उपगव्हर्नर पदावर होते. उपगव्हर्नर पदावर असताना त्यांना जो फ्लॅट देण्यात आला होता, त्यामध्येच सध्या ते राहत आहेत. शिवाय उर्जित पटेल यांना दोन कार आणि दोन ड्रायव्हर देण्यात आले आहेत.

माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनाही ऑगस्टमध्ये एवढाच पगार देण्यात आल्याचं माहिती अधिकारात दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. राजन यांचा 4 सप्टेंबरला कार्यकाळ संपला. त्यांना 4 दिवसांच्या अतिरिक्त वेतनासह 2 लाख 79 हजार 33 रुपये पगार देण्यात आला होता.

राजन यांनी सप्टेंबर 2013 मध्ये पदभार स्वीकारला तेव्हा त्यांचं वेतन 1 लाख 69 हजार एवढं होतं. त्यानतंर 2014 मध्ये 1 लाख 78 हजार, 2015 मध्ये 1 लाख 87 हजार आणि जानेवारी 2016 मध्ये 2 लाख 9 हजार अशी वेतन वाढ झाली.

राजन यांना तीन कार आणि चार ड्रायव्हर देण्यात आले होते. शिवाय त्यांना मुंबईत बँकेकडून एक आलिशान बंगला आणि एक केअरटेकरसह 9 सहाय्यक कर्मचारी देण्यात आले होते, अशी माहिती रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आली आहे.