Madhya Pradesh Hospital Fire: मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका खासगी रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. या आगीच्या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जबलपूरचे एसपी सिद्धार्थ बहुगुणा यांनी दिली. मृतांमध्ये बहुतांश रूग्णालयातील कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. या घटनेनंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली होती. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना इतर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तसेच 6 हुन अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गोहलपूर पोलीस स्टेशन हद्दीतील चांडाल भाटा भागातील न्यू लाईफ मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात दुपारी अचानक आग लागली. रुग्णालयातून बाहेर येण्याचा एकच मार्ग असल्याने बहुतांश लोक आत अडकले. पाहता पाहता आगीने भीषण रूप धारण केले. सुरुवातीला अग्निशमन दलाच्या गाड्यांनाही आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यानंतर वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वीज जोडणी कापली असता तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.


सरकारकडून मदत जाहीर

 



या आगीच्या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या ट्वीट केले की, "राज्य सरकार मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि गंभीर जखमींना 50,000 रुपयांची मदत देणार आहे. जखमींच्या संपूर्ण उपचारासाठी 50 हजार रुपये खर्च येणार आहे. सरकारही ते सहन करेल."




गेल्या वर्षी कमला नेहरू रुग्णालयात लागली होती आग 


 

दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये 2021 मध्ये नोव्हेंबर महिन्यात भोपाळमधील कमला नेहरू रुग्णालयाच्या मुलांच्या वॉर्डमध्ये आग लागली होती. या भीषण आगीत चार मुलांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर कमला नेहरू रुग्णालयाच्या संचालकांसह तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले. गांधी मेडिकल कॉलेज आणि हमीदिया रुग्णालयाच्या आवारात असलेल्या सरकारी कमला नेहरू हॉस्पिटलच्या स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट (SNCU) मध्ये गेल्या वर्षी 8 नोव्हेंबर रोजी रात्री 8.35 वाजता आग लागली होती.