भाजपच्या आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या 'शक्तीमान'चा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 21 Apr 2016 03:26 AM (IST)
देहरादून : उत्तराखंडच्या देहरादूनमधील भाजपच्या आंदोलनादरम्यान जखमी झालेला शक्तीमान घोड्याचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून शक्तीमानवर औषधांवर परिणाम होत नव्हता. शिवाय त्याच्या हालचालीही बंद झाल्या होत्या, असं डॉक्टरांनी सांगितलं. भाजप आमदार गणेश जोशी यांच्या आंदोलनादरम्यान शक्तीमानच्या पायाला दुखापत झाल्याने त्याचा पाय कापावा लागला होता. त्यानंतर शस्त्रक्रिया करुन शक्तीमानला अमेरिकेतून मागवलेला कृत्रिम पाय बसवण्यात आला होता. शक्तीमान बरा होऊन पुन्हा धावू शकेल असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला होता. मात्र बुधवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.