नवी दिल्ली : भारतातील रस्त्यांची एकंदर स्थिती पाहता बहुतांश लोक स्कूटर ऐवजी मोटरसायकल वापरणे पसंत करतात. होंडा कंपनीची अॅक्टीव्हा स्कूटर मात्र याला अपवाद ठरली आहे. गेल्या सहा महिन्यात भारतातील सर्वाधिक खपाची स्कूटर होण्याचा मान अॅक्टिव्हाला मिळाला आहे.
2016 च्या पहिल्या सहा महिन्यात होंडा कंपनीने 13.38 लाख अॅक्टिव्हांची विक्री केली आहे. सर्वाधिक खपाच्या हिरो स्प्लेंडरच्या खपापेक्षा होंडाने सुमारे 1.04 लाख स्कूटर जास्त विकल्या आहेत.
गेल्या वर्षी याच काळात होंडाने 1.97 लाख अॅक्टिव्हांची विक्री करत बाजी मारली होती. 17 वर्षांपूर्वी बाजारात आलेल्या या स्कूटरने आजपर्यंत अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. या स्कूटरला बरेच पुरस्कारही मिळाले आहेत.
होंडा अॅक्टिव्हाने स्टाईल, टेक्नॉलॉजी आणि मायलेज या सर्वच पातळ्यांवर बाजी मारत स्वतःचा एक मोठा ग्राहकवर्ग तयार केला आहे. होंडा अॅक्टिव्हा ही विश्वसनीयता, सुविधा आणि स्टाईल यांचा सुरेख संगम असून ग्राहकांनी आमच्यावर दाखवलेल्या या विश्वासाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत असं होंडाचे वरिष्ठ उपाध्यक्ष यादविंदर सिंग गुलेरिया म्हणाले.
होंडा कंपनीने 2001 साली अॅक्टिव्हा बाजारात आणली होती. बाजारात आल्यापासून अॅक्टिव्हा नेहमीच सर्वाधिक खपाची स्कूटर म्हणून ओळखली गेली आहे.
2001 मध्ये 55 हजार खप झालेल्या या स्कुटरने 2015-16 पर्यंत 1.2 कोटी खपाचा पल्ला गाठला होता. 125CC सेगमेंटमधील दुचाकींच्या एकुण खपातील 15 टक्के खप हा केवळ होंडा अॅक्टिव्हा या दुचाकीचा आहे. अॅक्टिव्हासोबत डीओ आणि एवीएटर या दुचाकीही होंडाने बाजारात उतरवलेल्या आहेत.