India China Clash : "हे भाजपचं सरकार आहे. एक इंचही जमीन कोणी घेऊ शकत नाही," अशी प्रतिक्रिया देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी दिली. अरुणाचल प्रदेमधील तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चिनी सैन्यामध्ये झालेल्या संघर्षाप्रकरणी अमित शाह यांनी माध्यमांशी बोलताना भाष्य केलं. सोबतच "राजीव गांधी फाऊंडेशनला 2005-06 आणि 2006-07 या वर्षात चिनी दूतावासाकडून 1 कोटी 35 लाखांचं अनुदान मिळालं. शिवाय इस्लामिक रिसर्च फाऊंडेशचा प्रमुख झाकीर नाईकने 7 जुलै 2011 रोजी राजीव गांधी फाऊंडेशला 50 लाख रुपयांचा निधी दिला होता," असा दावा त्यांनी केला. 


'भारतीय सैन्याने चिनी सैन्याला माघारी पाठवलं, त्यांच्या पराक्रमाचं कौतुक'


अरुणाचल प्रदेशच्या (Arunachal Pradesh) तवांग सेक्टरमध्ये (Tawang Sector) चिनी सैन्याच्या (China PLA) घुसखोरीचा डाव भारतीय जवानांनी (Indian Army) उधळून लावला. चीनच्या घुसखोरीला रोखताना दोन्ही बाजूने संघर्ष झाला. याविषयी अमित शाह म्हणाले की, "हे भाजपचं सरकार आहे. नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत. जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत एक इंचही जमीन कोणी घेऊ  शकत नाही. भारतीय सैन्याने तवांगमध्ये दाखवलेल्या पराक्रमाचं मी कौतुक करतो. त्यांनी काही वेळातच घुसखोरी करणाऱ्या चिनी सैन्याला माघारी पाठवलं आणि भारतीय भूमीची रक्षा केली." तर "2011 मध्ये काँग्रेस सरकारने चीनच्या धमकीनंतर सीमेवरील बांधकाम थांबवलं. काँग्रेस सरकारच्याच कार्यकाळात हजारो एकर जमिनी बळकावल्या होत्या," असा आरोपही अमित शाह यांनी केला.


'चिनी दूतावासाकडून राजीव गांधी फाऊंडेशनला 1 कोटी 35 लाखांचं अनुदान'


अमित शाह यांनी यावेळी राजीव गांधी फाऊंडेशनचं एफसीआरए रजिस्ट्रेशन का रद्द झालं याची माहिती देत काँग्रेसवर अनेक आरोप केले. "प्रश्नांची यादी पाहिल्यानंतर पाचव्या क्रमांकाचा प्रश्न वाचून मी विरोधकांची काळजी समजून गेलो. राजीव गांधी फाऊंडेशनचं एफसीआरए रजिस्ट्रेशन रद्द करण्याबाबत पाचवा प्रश्न होता. काँग्रेसच्याच सदस्याने याबाबत प्रश्न विचारला. राजीव गांधी फाऊंडेशनला 2005-06 आणि 2006-07 या वर्षात चिनी दुतावासाकडून 1 कोटी 35 लाखांचं अनुदान मिळालं. एफसीआरचे कायदे त्याच्या मर्यादेच्या अनुरुप नसल्याने नोटीस पाठवून कायदेशीर प्रक्रियेचं पालन करुन या फाऊंडेशनचं रजिस्ट्रेशन रद्द केलं होतं. तसंच राजीव गांधी फाऊंडेशनचं एफसीआरए रजिस्ट्रेशन रद्द करण्याचं आणखी एक कारण म्हणजे, इस्लामिक रिसर्च फाऊंडेशचा प्रमुख झाकीर नाईकने 7 जुलै 2011 रोजी फाऊंडेशला 50 लाख रुपयांचा निधी दिला होता. या फाऊंडेशनचे कर्ताधर्ता गांधी कुटुंब आहे, त्यांनी सांगावं की, झाकीर नाईकने हा पैसा कोणत्या उद्देशाने दिला होता?"


अमित शाह पुढे म्हणाले की "फाऊंडेशनने आपलं रजिस्ट्रेशन सामाजिक कार्यांसाठी केलं होतं. जी रक्कम चिनी दूतावासाकडून मिळाली त्याचा वापर भारत चीन संबंधांच्या विकासाच्या शोधावर खर्च करण्यात आला, असं सांगितलं जातं. आता या शोधामध्ये 1962 भारताची जी हजारो हेक्टर भूमी चीनने हडप केली त्याचा समावेश होता का? शोध केला तर त्याचा अहवाल काय होता? पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रेमापोटी सुरक्षा परिषदेतील भारताच्या स्थायी सदस्यत्वाचा बळी गेला हा विषय शोधात होता. जर असेल तर त्याचा निष्कर्ष काय होता?


VIDEO : Amit Shah : एक इंच जमीनही कोण भारताकडून घेऊ शकणार नाही, अमित शाहांचा दावा