भोपाळ : मध्यप्रदेशातील होशंगाबाद येथे आज (सोमवारी) भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये भारताच्या राष्ट्रीय आणि जिल्हास्तरीय चार हॉकीपटूंचा मृत्यू झाला आहे. सामना खेळायला जाताना हा अपघात असून तीन खेळाडू जखमी आहे.

होशंगाबादमध्ये सध्या मेजर ध्यानचंद हॉकी स्पर्धा सुरू आहे.  स्विफ्ट कारमधून  स्पर्धेसाठी जाताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६९ वर रैसलपूर गावाजवळ हा अपघात झाला. इटारसीच्या दिशेनं जाताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यानंतर ही कार थेट झाडावर जाऊन आदळली. त्यात चौघांचा जागीच मृत्यू झाला.

शाहनवाझ खान, आदर्श हरदुआ, आशिष लाल व अनिकेत  या राष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटूंचा या अपघातात मृत्यू झाला आहे. जखमी खेळाडूंची ओळख पटविण्याचं काम सुरू आहे. होशंगाबाद प्रशासनानं या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जखमी खेळाडूंना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. चौहान यांनी मृत खेळाडूंची नावं ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची ताकद  देवो, असं ट्विट त्यांनी केलं आहे.