मुंबई : फेअर अँड लव्हली.. भारतीय स्त्री पुरुषांच्या सर्वाधिक पसंतीच्या फेअरनेस क्रीममधून आता फेअर हा शब्द गायब होण्याची शक्यता आहे. हिंदुस्थान लीव्हर लिमिटेड या फेअर अँड लव्हलीचं उत्पादन करणाऱ्या कंपनीने हा निर्णय घेतलाय, फेअर अँड लव्हलीच्या रिब्रँडिंगमध्ये फेअर हे नाव वगळलं जाण्याची शक्यता आहे. भारतीयांच्या अनेक पिढ्यांची पसंती बनलेल्या या फेअरनेस क्रीमचं रिब्रँडिंग हा एक वेगळा प्रयोग ठरणार आहे.


 फेअर अँड लव्हलीमधील फेअर या शब्दातून फक्त गोरेपणाशी किंवा उजळपणाशी संबंधित मर्यादित अर्थ साधला जायचा. त्यामुळे वेळोवेळी हिंदुस्थान लिव्हर लिमिटेडवर टिकाही व्हायची.





 भारतीय पुरुषांना असलेल्या गोरेपणाच्या आकर्षणाचा व्यापार केला जात असल्याची टीका फेअर अँड लव्हलीच्या जाहिरात कँपेनवर अनेकदा झाली आहे.


 बॉलिवूडमधील आघाडीच्या एका अभिनेत्रीने गोरेपणाची किंवा उजळपणाची भलामण करणाऱ्या फेअरनेस क्रिमची जाहिरात करण्यास मनाई केल्यानंतरही हा मुद्दा चर्चिला गेला होता. हिंदुस्थान लिव्हर लिमिटेडच्या फेअर अँड लव्हलीचं नाव बदलण्याच्या निर्णयामागे अमेरिकेत अलीकडेच झालेल्या जॉर्ज क्लॉईडच्या हत्येनंतर उसळलेल्या आंदोलनाची किनार असण्याची शक्यता आहे.



सौंदर्य फक्त गोरेपणाशी किंवा उजळपणापुरतंच मर्यादित नाही, हे अधोरखित करण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचं हिंदुस्थान लिव्हरकडून सांगण्यात आलंय. म्हणूनच यापुढे फेअर अँड लव्हलीमधील फेअर हा शब्द वगळला जाणार आहे.. या फेअरनेस क्रीमचं नवं नाव काय असेल ते संबंधित नियंत्रकांच्या अनुमतीनंतर निश्चित हील. त्यासाठी किमान दोन तीन महिन्यांची प्रतिक्षा करावी लागेल.


 हिंदुस्थान लिव्हरची पालक कंपनी असलेल्या युनिलिव्हरच्या प्रसिद्धी पत्रकात या बदलाविषयी म्हटलं आहे की कंपनीची उत्पादने फक्त गोऱ्या त्वचेची निगा घेण्यासाठी नाहीत. फेअरनेस या शब्दात फक्त उजळपणाला प्राधान्य दिलं जात असल्याचा बोध होतो. फेअरनेस, व्हाईटनिंग, लाईटनिंग अशा सर्वच विशेषणांना आणि शब्दांचा हिंदुस्थान लिव्हरच्या स्कीन केअर उत्पादनांमध्ये स्थान नसणार आहे. फेअर अँड लव्हलीचं नाव बदलण्याचा निर्णय या धोरणाचाच एक भाग आहे.