Earthquake in Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. शनिवारी सकाळी 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाच्या झटक्याची नोंद झाली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातील धर्मशालापासून 22 किमी पूर्वेला पहाटे 5:17 वाजता 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे झटके जाणवले. या भूकंपामुळे जीवित आणि वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही.
दरम्यान, याबाबत सध्या अधिक माहिती समोर आलेली नाही. याआधी 5 जानेवारी रोजी दिल्लीमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला होता. जम्मू आणि काश्मीरमध्येही भूकंपाचे झटके बसले होते. तेथे 5.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. या भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानमधील हिंदू कुश परिसरात होते.
वर्षाच्या पहिल्या दिवशीही जाणवले होते भूकंपाचे धक्के
2023 नववर्षाच्या पहिल्या दिवशीही देशात वेगवेगळ्या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले होते. 1 जानेवारी रोजी रात्री 11:28 वाजता मेघालयमधील नोंगपोह येथे 3.2 रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू नॉन्गपोहमध्ये जमिनीपासून 10 किमी अंतरावर होता. त्यापूर्वी 27 आणि 28 डिसेंबरच्या रात्री अडीच तासांच्या आत उत्तराखंडमधील उत्तरकाशीपासून नेपाळपर्यंत अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले होते. नेपाळमधील बागलुंग जिल्ह्यात भूकंपाचा पहिला धक्का जाणवला होता. त्यानंतर भूकंपाचा दुसरा धक्का खुंगाच्या आसपास परिसरात जाणवले. या भूकंपाची तीव्रता 5.3 स्केलवर नोंदवली गेली होती.
देशाची पाच भूकंप झोनमध्ये विभागणी
भारतीय मानक ब्युरोने (BIS) संपूर्ण देशाची पाच भूकंप झोनमध्ये विभागणी केली आहे. देशाचा 59 टक्के भाग भूकंपाच्या धोक्याचे क्षेत्र आहे. पाचवा झोन हा देशातील सर्वात धोकादायक आणि सक्रिय क्षेत्र मानले जातो. या झोनमध्ये येणारी राज्ये आणि भागात भूकंपामुळे विध्वंसाची शक्यता सर्वाधिक आहे. या पाचव्या झोनमध्ये जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेशचा पश्चिम भाग, उत्तराखंडचा पूर्व भाग, गुजरातमधील कच्छ, उत्तर बिहारचा भाग, भारतातील सर्व ईशान्य राज्ये, अंदमान आणि निकोबार बेटे यांचा समावेश होतो.