नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांचं मतदान अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलं आहे. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून भाजपतर्फे प्रेम कुमार धुमाल यांचं नाव पुढे करण्यात आलं आहे.
सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम देत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी धुमाल यांच्या नावाची घोषणा केली. हिमाचलच्या मुख्यमंत्रिपदासाठी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र राज्यात धुमाल यांचा जनसंपर्क दांडगा असल्यामुळे त्यांच्या खांद्यावर ही धुरा सोपवल्याचं म्हटलं जातं.
'प्रेम कुमार धुमाल यांच्या नेतृत्वात भाजप हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुका लढवेल. धुमाल हे माजी मुख्यमंत्री असले, तरी 18 डिसेंबर नंतर ते नवे मुख्यमंत्री असतील' असं शाह म्हणाले. बहुमत मिळवण्यासाठी धुमाल भाजपचं नेतृत्व करतील, असंही अमित शाह म्हणाले.
दांडगा प्रशासकीय अनुभव असलेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये धुमाल यांचा समावेश होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. ट्विटरवरुन मोदींनी प्रेम कुमार धुमाल यांना शुभेच्छा दिल्या आहेत. हिमाचल प्रदेशला भ्रष्टाचारमुक्त करुन विकासाचं राजकारण करण्यावर भर असल्याचं मोदी म्हणाले.
https://twitter.com/narendramodi/status/925349000156397570
आपल्या नावाची घोषणा झाल्यानंतर प्रेम कुमार धुमाल यांनी हायकमांड, पक्षातील कार्यकर्ते आणि हिमाचल प्रदेशमधील जनतेचे आभार मानले.