रांची : जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग (Jharkhand Money Laundring Case) प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर हेमंत सोरेन (Hemant Soren) हे आता पुन्हा एकदा झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्या आधी मुख्यमंत्री चंपाई सोरेन (Champai Soren Resignation) यांनी त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्त केला होता. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नेतृत्वातील फेरबदल महत्त्वाचे मानले जात आहेत.
झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले आहे. हेमत सोरेन हे राज्याचे 13 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. राजभवनात संध्याकाळी 5 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे.
काय म्हणाल्या कल्पना सोरेन?
हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यावर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, "अखेर लोकशाहीचा विजय झाला. 31 जानेवारी 2024 पासून सुरू झालेल्या अन्यायाला आता खऱ्या अर्थाने न्याय मिळू लागला आहे. जय झारखंड.
जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने झारखंडचे तत्कालिन मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना 31 जानेवारी रोजी अटक केली होती. ईडीच्या ताब्यात असताना त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि या पदाची कमान चंपाई सोरेन यांच्याकडे सोपवली. झारखंड उच्च न्यायालयाने 28 जून रोजी हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर केला होता. जामिनावर बाहेर आल्यापासून सोरेन पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
दरम्यान, झारखंडमध्ये बुधवारी (3 जुलै) इंडिया आघाडीचे आमदार आणि नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत हेमंत सोरेन यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर हेमंत सोरेन आणि चंपाई सोरेन इतर नेत्यांसह राजभवनात पोहोचले. चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि हेमंत सोरेन यांनी सरकार स्थापनेचा दावा केला.
ही बातमी वाचा :