नवी दिल्ली :  कोरोनाचा कहर देशात थैमान घालत असतानाच आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. मागील दोन दिवसांमध्ये देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडूनच यासंबंधीची माहिती देण्यात आली. संचारबंदी आणि लॉकडाऊनच्या निर्णयांमुळं कोरोना रुग्ण घटल्याचं निरीक्षण आरोग्य मंत्रालयानं नोंदवलं आहे.


रुग्णसंख्येत काही अंशी घट दिसून आली असली तरीही 26 राज्यांचा पॉझिटीव्हिटी रेट 15 टक्क्यांहून जास्त आहे. तर, 13 राज्यांमध्ये कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या 1 लाखांहून जास्त आहे. 6 राज्य अशी आहेत जिथं सक्रिय रुग्णसंख्या 50 हजार ते 1 लाखांच्या दरम्यान आहे. तर, 17 राज्यांमध्ये सक्रिय रुग्ण 50 हजारांहूनही कमी आहेत. देशात आतापर्यंत 82.75 टक्के कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर, 1.09 टक्के रुग्णांचा या विषाणूच्या संसर्गामुळं मृत्यू झाला आहे. 


भारत बायोटेकच्या Covaxin लसीची 2 ते 18 वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी शिफारस


कैक राज्यांत रुग्णसंख्या कमी 


कोरोनाचा जबर फटका बसलेल्या राज्यामध्ये आता या संसर्गाची लाट काही अंशी नियंत्रणात येताना दिसत आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, छत्तीसगढ, बिहार, लडाख, दमण आणि दीव, अंदमान निकोबार, लक्षद्वीप, तेलंगणा, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये दर दिवशी आढळणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली आहे. 


Goa Lockdown : गोव्यात जाणाऱ्यांसाठी आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल अनिवार्य


काही राज्यांत मात्र कोरोना रुग्णांचा चढता आलेख कायम 


देशाती काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा आलेख नियंत्रणात आल्याचं चित्र असलं तरीही काही राज्य मात्र याला अपवाद ठरत आहेत. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओडिशा, पंजाब, आसाम, काश्मीर, गोवा, हिमाचल प्रदेश, पुदुच्चेरी, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांत रुग्णसंख्यावाढ चिंताजनक आहे. त्यामुळं आता देशातील या राज्यांमध्ये कोणती नवी पावलं उचलली जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.