नवी दिल्ली : एकीकडे सरकार डिजीटल व्यवहारांना प्रोत्साहन देत आहे, तर दुसरीकडे बँकांकडून याचा पुरेपूर फायदा घेत ऑनलाईन व्यवहारांवर चार्ज लावला जात आहे. आता एचडीएफसी बँकही 10 जुलैपासून यूपीआय व्यवहारांवर चार्ज लावणार आहे.

एचडीएफसीने ई-मेलद्वारे 10 जुलैपासून यूपीआयच्या व्यवहारांवर चार्ज लावणार असल्याची माहिती दिली आहे. 10 जुलैपासून खातेधारकांना 1 रुपयापासून 25 हजार रुपयांपर्यंतच्या यूपीआय ट्रांझॅक्शनवर 3 रुपये चार्ज अधिक सर्विस टॅक्स द्यावा लागणार आहे. तसंच 25 हजार आणि 1 लाखांपर्यंतच्या व्यवहारावर 5 रुपये चार्ज द्यावा लागणार आहे.

NEFT च्या तुलनेत UPI ट्रांझॅक्शन महाग असणार

10 जुलै नंतर यूपीआयद्वारे होणारे ट्रांझॅक्शन NEFT पेक्षा महाग होणार आहेत. कारण NEFT द्वारे 10 हजारांपर्यंतच्या ट्रांझॅक्शनवर 2.5 रुपये आणि यावरील व्यवहारावर 5 रुपये चार्ज लावला जातो. मात्र यूपीआयचे व्यवहार आता यापेक्षा महागणार आहेत.



यूपीआय म्हणजे काय?

  • यूपीआई म्हणजेच यूनीफाइड पेमेंट इंटरफेस (Unified Payment Interface) पैसे पाठवण्याचा नवा मार्ग आहे. NEFT, RTGS आणि IMPS सिस्टमद्वारे पैसे पाठवण्यापेक्षा यूपीआय जास्त सोपा मार्ग आहे.

  • प्रत्येक बँकेचं यूपीआय अॅप आहे. ज्यावर युनिक आयडी आणि यूपीन सेट करून पैशांची देवाणघेवाण केली जाते. यावरून पैसे पाठवतांना दुसऱ्या व्यक्तीच्या खात्याबद्दलची माहिती म्हणजे अकाउंट नंबर, शाखेचं नाव, खातेधारकाचं नाव अशी माहिती असणं आवश्यक नाही.

  • तुम्हाला एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवायचे असतील आणि त्यासाठी त्याला खाते क्रमांक सांगायचा नसेल तर यूपीआय उत्तम माध्यम आहे.

  • यूपीआयद्वारे खाते क्रमांक जाणून न घेताही पैसे पाठवता येतात. कारण याद्वारे बँक खात्याशिवाय वर्च्युअल पेमेंट अड्रेसद्वारेही (VPA) पैसे पाठवता येतात.