Hathras stampede Bhole Baba : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे भोलेबाबा यांच्या सत्संगावेळी चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये 121 जणांचा बळी गेला. दुर्घटनेनंतरची दृश्य ही मन विषण्ण कऱणारी होती. देवाचा धावा करण्यासाठी आलेले भाविक थेट देवाघरी पोहोचलेत.यात कुणाची आई आहे.कुणाचा बाप आहे. कुणाची बहीण, कुणाचा भाऊ आहे. तर कुणाचे इवले इवले पोटचे गोळे आहेत. सिकंदराबादच्या फुलरई गावात भोलेबाबा नावाच्या महाराजाचा सत्संग आयोजित केला होता. आणि याच सत्संगानंतर, या बाबाच्या पायाखालची माती घेण्यासाठी जत्थेच्या जत्थे धावले. आणि त्यांच्या आयुष्याची अक्षरश: माती झालीय. जिथं हा सत्संग झाला तिथं आता भयाण स्मशान शांतता पसरलीय तर ज्यांचे जीव गेले त्यांच्या घरात फक्त आणि फक्त हंबरडा आणि आक्रोश उरला आहे.


हाथरसमध्ये नेमकं काय घडलं?


सत्संगासाठी 80 हजार जणांची परवानगी असतानाही त्या दिवशी 2.50 लाख भाविक जमले होते. सत्संग संपल्यावर भोलेबाबाची चरणधूळ गोळा करण्यासाठी पळापळ झाली.  चरणधुळीसाठी अनेक जण बसलेल्यांच्या अंगावरून धावत गेले. यामुळे अनेक जण खाली पडले, त्यांच्या अंगावरून लोक जात राहिले. काही क्षणांत या पळापळीचं चेंगराचेंगरीत रुपांतर झालं. पुढच्या बाजूनं सत्संग समितीचे लोक भाविकांना रोखत होते. त्यामुळे मागे गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरीची तीव्रता आणखी वाढली. या दुर्देवी घटनेमध्ये जीव गुदमरून 121 जणांचा मृत्यू झाला, यामध्ये 100 पेक्षा जास्त महिलांचा समावेश आहे. अनेकजण यामध्ये जखमीही झाले. 


कोण आहे भोले बाबा?


भोले बाबाचं खरं नाव सूरज पाल असे आहे. भोले बाबानं 17 वर्षांपूर्वी पोलीस खात्यातली नोकरी सोडून सत्संग सुरू केला होता. सत्संग सुरू केलेल्यानंतर तो साकार विश्व हरी भोले बाबा बनला. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेशात त्यांचे मोठ्या संख्येनं अनुयायी आहेत. भोले बाबासोबत त्याची पत्नीही प्रवचन देते. कोरोनाच्या काळात भोले बाबाचा सत्संग वादात सापडला होता. आता हाथरसची दुर्घटना घडल्यानंतर भोले बाबा फरार आहे. त्याने एक पत्रक जारी करत दुर्घटनेबाबत मत व्यक्त केलेय. 


आता या महाभयंकर घटनेवरून आरोप प्रत्यारोपांची जंत्री सुरू झालीय. राहुल गांधी, ओवेसी, अखिलेश यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू झालीय. त्यामुळे, फरार झालेल्या भोलेबाबाचा शोध घेऊन 121 जणांचा जीव जाण्यास जो  जबाबदार आहे, त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी.