नवी दिली : हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल (Haryana Vidhan Sabha Election Result 2024) आता समोर येत आहेत. हरियाणातील आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार सर्व एक्झिट पोल (Exit Poll) अयशस्वी होताना दिसत आहेत. ट्रेंडमध्ये भाजपला (BJP) बहुमत मिळाले आहे. निकालाचा कल बदलला तर 2019 प्रमाणे राज्यातील एक्झिट पोल पुन्हा फोल ठरणार आहे.
ट्रेंडमध्ये भाजप 47 जागांवर आघाडीवर दिसून येत आहे. तर काँग्रेस 36 जागांवर आघाडीवर आहे. त्याचबरोबर इतर 7 जागांवर आघाडीवर आहे. त्याचवेळी, बहुतेक एक्झिट पोल हरियाणात काँग्रेसचे (Congress) सरकार स्थापन दर्शवत होते. पोल ऑफ पोलमध्ये हरियाणात काँग्रेसला 55 तर भाजपला 25 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
हरियाणात 2019 मध्येही चुकले होते एक्झिट पोलचे अंदाज
2019 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोलने भाजपला 61 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला होता तर काही एक्झिट पोलने 75-80 जागा जिंकण्याचा अंदाजही वर्तवला होता. मात्र, निकाल एक्झिट पोलपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. भाजपने 40 जागा जिंकल्या. तर काँग्रेसला 31 जागा जिंकण्यात यश आले होते. भाजपच्या स्पष्ट बहुमताच्या एक्झिट पोलच्या अंदाजाच्या विरुद्ध निकाल 2019 साली लागल्याचे दिसून आले होते. सी व्होटरनेही भाजप 72 जागा जिंकेल असा अंदाज वर्तवला होता, तो देखील चुकीचा ठरला होता. यंदाच्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत देखील एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे ठरत असल्याचे दिसून येत आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीतही चुकले होते एक्झिट पोलचे अंदाज
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) अनेक एक्झिट पोलने भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार बहुमताने जिंकेल असा अंदाज वर्तवला होता. लोकसभा निवडणुकीत एनडीएला 361 ते 401 जागा मिळतील, असा अंदाज होता. तर भाजप स्वबळावर बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त जागा जिंकेल, असाही अंदाज एक्झिट पोलने वर्तवला होता. मात्र, एक्झिट पोलचे निकाल चुकीचे ठरले होते. लोकसभा निवडणुकीत एनडीएला 293 तर भाजपला 240 जागा मिळाल्या.
हरियाणात कोण सत्ता स्थापन करणार?
दरम्यान, सध्या हरियाणात काँग्रेस पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपने मोठी मुसंडी घेतली असून भाजपाची 47 जागांवर आघाडी आहे. तर काँग्रेस केवळ 36 जागांवर आघाडीवर आहे. मात्र निवडणुकीचा निकाल सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. हरियाणात कोण सत्ता स्थापन करणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या