चंदीगड : गोरक्षेच्या नावाखाली हिंसा करणाऱ्यांची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी सूचना पंतप्रधान मोदी यांनी केल्यानंतर हरियाणा सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. हरियाणा सरकार आता गोरक्षकांना ओळखपत्र देणार आहे, ज्यामुळे गोरक्षक सहजपणे ओळखता येतील. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी हा निर्णय घेतला.


मोदी काय म्हणाले?

गोरक्षेच्या नावावर हिंसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. गोमातेचं संरक्षण गरजेचं आहे. पण त्यासाठी कायदा आहे. कायदा हातात घेऊन वैयक्तिक दुश्मनी काढण्यासाठी गोरक्षेच्या नावावरील हिंसा सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस अगोदर राजधानी दिल्लीत सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत मोदींनी देशात गोरक्षेच्या नावावर होणाऱ्या हिंसेबाबत वक्तव्य केलं.

गोरक्षेच्या नावावर हिंसा करणाऱ्यांना मोदींनी स्पष्ट शब्दात इशार दिला. गोरक्षेच्या नावाखाली कुणी वैयक्तिक दुश्मनी तर काढत नाही ना, यावरही राज्य सरकारने लक्ष ठेवलं पाहिजे. प्रत्येक राज्य सरकारने अशा घटनांना गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचं मोदींनी सांगितलं.

नागपुरात स्वयंघोषित गोरक्षकांची मांस विक्रेत्याला मारहाण

नागपुरात सलीम 12 तारखेला त्याच्या दुचाकीवरुन डिक्कीत मांस घेऊन चालले होते. त्यावेळी अचानक समोरुन आलेल्या जमावाने त्याला थांबवलं आणि मारहाण करायला सुरुवात केली.

गर्दीतल्या अनेकांनी त्यांना ओढून रस्त्यावर फेकलं आणि लाथा बुक्क्यांनी मारलं. हे गोमांस नसल्याचं ते वारंवार सांगत होते, मात्र कोणीही त्यांचं ऐकलं नाही. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांची सुटका केली.

तपासानंतर जमावाकडून मारहाण झालेल्या भाजप कार्यकर्त्याकडे गोमांसच असल्याचं निष्पन्न झालं. एफएसएलच्या अहवालात ही माहिती समोर आल्याचं ‘एबीपी माझा’ला विश्वसनीय सुत्रांनी सांगितलं.

सलीम इस्माइल शाह यांना नागपुरातील भारसिंगीमध्ये 12 जुलै रोजी गोमांस बाळगल्याच्या कारणावरुन जमावाने बेदम मारहाण केली होती. त्यानंतर शाह यांनी गोमांस नसल्याचा दावा केला होता. मात्र फॉरेन्सिक अहवालात कार्यकर्त्याचं बिंग फुटलं आहे.