हेग : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारत आणि पाकिस्तानने आपापली बाजू मांडली. देशातील सर्वात महागडे वकील हरिश साळवे यांनी कोर्टात भारताचं प्रतिनिधीत्व केलं.


हरिश साळवे देशातील सर्वात महागड्या वकिलांपैकी एक आहेत. एका दिवसाच्या सुनावणीसाठी ते तब्बल 30 लाख रुपये फी घेतात. मात्र कुलभूषण जाधव यांच्या सुनावणीसाठी त्यांनी केवळ एक रुपया फी घेतली आहे. खुद्द परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ही माहिती दिली.

https://twitter.com/SushmaSwaraj/status/864173762203275266

हरिश साळवे यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जे काम केलं, तेच काम इतर वकीलही करु शकला असता आणि फी देखील कमी लागली असती, असं ट्वीट एका व्यक्तीने केलं. हरिश साळवेंनी केवळ एक रुपया फी घेतली आहे, असं उत्तर सुषमा स्वराज यांनी त्या ट्वीटला दिलं.

हरिश साळवे यांनी न्यायालयात भक्कमपणे भारताची बाजू मांडली. विविध प्रकारे त्यांनी पाकिस्तानच्या खोटारडेपणाच्या चिंधड्या उडवल्या.

हरीश साळवेंची आजवरची कारकीर्द!

बॅरिस्टर हरीश साळवे… आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू भक्कम करणारं हे नाव. देशातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांमध्ये 43वं नाव.

हरीश साळवे यांचा जन्म धुळे जिल्ह्यातल्या वरुड या गावात झाला. यांना वकिलीचं बाळकडू घरातूनच मिळालं. साळवे यांचे आजोबा पी. के. साळवे हे प्रख्यात क्रीमिनिल लॉयर होते. तर त्यांचे पणजोबा हे न्यायाधीश होते. साळवे यांचे वडील एन. के. पी. साळवे हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते.

हरीश साळवे हे वकिली करण्याआधी सीए झाले. पण प्रख्यात वकील नानी पालखीवाला यांच्यामुळे प्रभावित झालेल्या साळवे यांनी सीए झाल्यानंतर वकिलीची डिग्री मिळवली.

* 1980 मध्ये जे. बी. दादाचंदजी आणि कंपनी यांच्याकडे साळवे यांनी इंटर्नशिप केली

* 1980 ते 1986 दरम्यान साळवे यांनी अॅटॉर्नी जनरल सोली सोराबजी यांच्यासोबतही काम केलं

* हरीश साळवे यांनी सर्वात आधी सर्वोच्च न्यायालयात अँटी डम्पिंग केस लढली.

* कृष्णा गोदावरी बेसिन गॅस वादाची केसही साळवे यांनीच अंबानींच्या बाजूने लढली होती.

* टाटा ग्रुपच्या अनेक खटल्यांची जबाबदारीही साळवे यांनी पेलली होती.

* भारत सरकारसोबतच्या कराच्या वादातही साळवे यांनी व्होडाफोनची बाजू मांडली

* इतकंच नाही, तर बिल्किस बानोची केसही साळवे यांनीच लढली होती.

* सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणातही साळवे यांनी सलमानची केस लढली.

साळवे यांच्या करियरचा आलेख कायम चढता असला, तरी त्यांच्याभोवती वादांची मालिकाही कायम होती.

– 2009 साली गुजरात दंगलीच्या निष्पक्ष न्यायादानासाठी हरीश साळवे हे योग्य वकील नसल्याचा दावा त्यांच्या विरोधकांनी केला.

– 2011 मध्ये तहलका मॅगझिननेही साळवे यांच्यावर गंभीर आरोप करत, मोदी सरकारशी साटंलोटं केल्याचा दावा केला.

– हरीश साऴवे हे अत्यंत महागडे वकील असून, फक्त उद्योजकांसाठी ते लॉबिंग करतात असा आरोपही त्यांच्यावर आहे.

कायद्याच्या धीरगंभीर वातावरणात असलेल्या हरीश साळवे यांची वेगळी बाजूही आहे. कारण साळवे हे संगीतप्रेमी असून, त्यांना चक्क पियानो वाजवण्याचा छंद आहे. इतकंच नाही, तर संगीत याच विषयात एके दिवशी आपण ऑक्सफर्ड विद्यापीठातही तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन करण्याचा विश्वास त्यांना आहे.

साळवे जितके निष्णात कायदेतज्ज्ञ आहेत. तितकेच त्यांचे शौक मोठे आहेत.

* साळवे यांच्या एका दिवसाची फी ही तब्बल 30 लाख रुपये असून, अंबानी बंधूंच्या एका खटल्यासाठी त्यांनी 15 कोटी आकारल्याचा दावा आहे.

* त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना फाईव्ह स्टार्स हॉटेल्स आणि फर्स्ट क्लास एअर तिकीट्स बुक करावी लागतात अशीही ख्याती आहे.

* ब्रिटीश हँडमेड फोन व्हर्च्यु आणि महागड्या घड्याळ्यांचे साळवे शौकीन आहेत.

* साळवे हे केस फक्त एकदाच ऐकतात आणि त्यानंतर पुन्हा ते वादी किंवा प्रतिवादीला भेटत नाहीत.

* साळवे यांच्या ताफ्यात बेन्ट्लीसारखी गाडी आहे. तर त्यांचं गोव्यात हॉलिडे होम आहे.

* आपल्या कपडे खरेदीसाठी साळवे हे थेट लंडनला जातात.

काहीही असो, पण साळवे यांच्या कर्तृत्वाला कुणीच नाकारु शकणार नाही, आताही एका मराठी माणसाच्या सुटकेसाठी एक मराठी माणूस सातासमुद्रापार लढतोय. हीच मोठी गोष्ट आहे.

संबंधित बातमी :

पाकचा सर्वात मोठा पुरावा आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फेटाळला!