गांधीनगर :  गुजरातमध्ये काही दिवसांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. गुजरातमध्ये काँग्रेसचा उत्साह वाढलाय, कारण त्यांना हार्दिक पटेलची साथ मिळणार आहे. मात्र आता पाटीदार समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन हार्दिक पटेलने काँग्रेसलाच अल्टिमेटम दिलं आहे.

"3 नोव्हेंबरपर्यंत पाटीदार समाजाला घटनात्मक आरक्षण कसे देणार, यावर काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा अमित शाह यांचं सुरतमध्ये जसं झालं, तसं होईल.", असा अल्टिमेटम हार्दिक पटेलने काँग्रेसला दिला आहे.

https://twitter.com/HardikPatel_/status/924178466404171776

राहुल गांधी3 नोव्हेंबर रोजी सुरतच्या दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांची याआधी सुरतमध्ये सभा झाली, त्यावेळी पाटीदार समाजाच्या लोकांनी गोंधळ घातला होता. त्यामुळे पाटीदार समाजाच्या आरक्षणावरील भूमिका स्पष्ट न केल्यास 3 नोव्हेंबरच्या सभेत गोंधळ घातला जाईल, असाच अप्रत्यक्ष इशारा हार्दिक पटेलने दिला आहे.

गुजरातमध्ये 15 टक्के पाटीदार समाज

गुजरातमध्ये पाटीदार समाज एकूण लोकसंख्येच्या 15 टक्के आहे. राज्यातील जवळपास 80 जागांवर पाटीदार समाजाच्या मतांची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यात पाटीदार समाज हा भाजपचा व्होट बँक मानली जाते. भाजपचे 44 आमदार हे पाटीदार समाजाचे आहेत. मात्र गेल्या काही काळापासून पाटीदार समाज भाजपपासून दुरावला असून, भाजपवर नाराज आहे. या साऱ्या स्थितीचा फायदा घेत, काँग्रेस पाटीदार समाजाला जवळ करु पाहते आहे. कारण पाटीदार समाज सोबत आल्यास काँग्रेसला मोठा फायदा होईल. मात्र हार्दिक पटेलच्या अल्टिमेटमध्ये काँग्रेससमोरील अडचणीही वाढल्या आहेत.

...म्हणून पाटीदार समाज भाजपवर नाराज

गुजरातमध्ये तीन प्रकारचा  पाटीदार समाज आहे. कडवा, लेउवा आणि आंजना या तीन पाटीदार समाजापैकी आंजना समाज हा ओबीसीमध्ये येतो. मात्र कडवा आणि लेउवा पाटीदार समाजाला आरक्षण मिळालं नाही. त्यामुळे हा समाज आरक्षणाची मागणी करत असून, त्यांची भाजपवर तीव्र नाराजी आहे.