Hardik Patel : काँग्रेसचा हात सोडून भाजपचे कमळ हाती घेण्याच्या तयारीत हार्दिक पटले आहेत. पक्ष प्रवेशापूर्वी हार्दिक पटेल यांनी ट्वीट केले आहे. राष्ट्रसेवेच्या भगीरथ कार्यात एक छोटा शिपाई बनून काम करणार असल्याचे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे. हार्दिक यांनी काँग्रेसला रामराम केल्यापासूनच त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला होता. आता या चर्चांना पूर्णविराम लागला असून हार्दिक पटेल आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. 


हार्दिक पटेल आज दुपारी 12 वाजता पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यापूर्वी गुजरातमध्ये पक्ष प्रवेशाचे पोस्टर, बॅनर लावण्यात आले आहेत. या वर्षाच्या अखेरीस गुजरात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.  गेल्या दोन दशकांहून अधिक काळ राज्यात भाजपची सत्ता आहे. हार्दिक पटेल यांनी ट्वीट करून म्हटले की, राष्ट्रहित, राज्यहित, जनहित आणि सामाजिक हित या भावनेतून मी आजपासून एक नवा अध्याय सुरू करणार आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राष्ट्रसेवेच्या भगीरथ कार्यात मी लहान शिपाई बनून काम करणार आहे.






हार्दिक पटेल यांच्या जारी करण्यात आलेल्या पोस्टरनुसार, भाजप प्रवेशापूर्वी ते साधु-संतांसह गोपूजेत सहभागी होतील. त्यानंतर ते 11 वाजता कमलम् गांधीनगरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील.


पाटीदार आंदोलनातून चर्चेत


 2015 मध्ये, 28 वर्षीय हार्दिक पटेलने पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हिंसक आंदोलन केले. एकेकाळी भाजपचे कट्टर टीकाकार असलेले पटेल यांच्यावर गुजरातच्या तत्कालीन भाजप सरकारने देशद्रोहासह अनेक गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर हार्दिक पटेलने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हार्दिक पटेल यांना काँग्रेसचे गुजरातचे कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते.  


काँग्रेसला रामराम 


हार्दिक यांनी  2019 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसनं 11 जुलै 2020 रोजी हार्दिक यांची गुजरात प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. काँग्रेस नेतृत्वाकडून खूप त्रास दिला जात असल्यामुळे त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं हार्दिक पटेल यांनी सांगितलं.