‘गुजरातच्या विकासाबद्दल काहीच व्हिजन त्यांनी लोकांसमोर ठेवलं नाही. कदाचित सीडी बनवण्याच्या चक्करमध्ये भाजप जाहीरनामा विसरली.’ असा टोला हार्दिकनं यावेळी लगावला आहे.
हार्दिक पटेलनं ट्विटरवरुन भाजप आणि मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. 'गुजरातमध्ये विकासासोबत जाहीरनामाही गायब झाला आहे. साहेब तुम्हाला कोणी काहीही बोलणार नाही. कृपया तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या स्टाइलमध्ये जाहीरनामा फेका.' असं ट्वीट हार्दिकनं केलं आहे.
हार्दिकनं का केला सीडीचा उल्लेख?
नोव्हेंबर महिन्यात हार्दिक पटेलचा एक कथित सीडी यू-ट्यूबवर व्हायरल झाली. या व्हायरल व्हिडीओमध्ये दावा करण्यात आला होता की, या व्हिडीओमध्ये असणारा व्यक्ती हा हार्दिक पटेल असून त्याच्यासोबत एक तरुणीही आहे. या व्हिडीओवरुन गुजरातमध्ये राजकारण चांगलंच तापलं. त्यामुळेच हार्दिकनं आता अशा पद्धतीनं निशाणा साधला.
जाहीरनाम्यावरुन काँग्रेसचीही भाजपवर टीका
दरम्यान, भाजपच्या जाहीरनाम्यावरुन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे. 'गुजरात विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्याचा प्रचारही संपला. तरीही भाजपनं जनतेसाठी कोणताही जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. गुजरातच्या भविष्यासाठी भाजपनं कोणतंही व्हिजन मांडलेलं नाही.' अशी टीका राहुल गांधींनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन केली आहे.
सध्या ट्विटरवर ‘बीजेपी का मेनिफेस्टो किधर है’ हा सवाल ट्रेंडिंगमध्ये आहे. त्यामुळे विकासाची भाषा करणारे सध्या नीच शब्दाचं राजकारण करण्यात अडकल्याचं हार्दिकनं म्हटलं आहे.
गुजरातमध्ये 182 विधानसभा जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात उद्या (9 डिसेंबर) 8 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 89 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी 14 डिसेंबरला मतदान होईल. तर 18 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.