- भाजप 104
- काँग्रेस 78
- जनता दल (सेक्युलर) 38
- बहुजन समाज पार्टी 1
- कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1
- अपक्ष 1
कर्नाटकच्या विजयाचा आनंद, मात्र वाराणसीच्या दुर्घटनेने मन हेलावलं : मोदी
एबीपी माझा वेब टीम | 16 May 2018 08:19 AM (IST)
कर्नाटकमध्ये यश मिळवल्यानंतर भाजप मुख्यालयात भाजपाध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. कर्नाटकचा विजय हा असामान्य आणि अभूतपूर्व आहे, असं मोदी म्हणाले. तर वाराणसीतील दुर्घटनेबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं.
नवी दिल्ली : कर्नाटकच्या विजयाचा आनंद आहे. मात्र आपला लोकसभा मतदारसंघ वाराणसीतील दुर्घटनेचं दुःख आहे. वाराणसीत उड्डाणपुलाचा भाग कोसळून अनेकांचा मृत्यू झालाय, तर अनेक जण जखमी झाले आहेत. याबाबतीत यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा झाली असून मदतकार्य सुरु आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. कर्नाटकमध्ये यश मिळवल्यानंतर भाजप मुख्यालयात भाजपाध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. कर्नाटकचा विजय हा असामान्य आणि अभूतपूर्व आहे. भाजपची प्रतिमा हिंदी भाषिक राज्यांमधील पक्ष अशी केली गेली. मात्र भाजपने बिगर हिंदी भाषिक राज्यातही विजय मिळवला, असं म्हणत मोदींनी कार्यकर्त्यांचं अभिनंदनही केलं. ''कर्नाटकच्या विजयाचा आनंद आहे. कार्यकर्ता म्हणून, मुख्यमंत्री म्हणून अनेक राज्यांचा दौरा केला. अनेक ठिकाणी भाषेची अडचण झाली. मात्र कर्नाटकच्या जनतेने एवढं प्रेम दिलं, की भाषेची कोणतीही अडचण आली नाही,'' असं म्हणत मोदींनी कर्नाटकच्या जनतेचे आभारही मानले. ''कार्यकर्ता म्हणून काय काम करायचं हे शिकण्यासाठी एखाद्या शाळेत जाण्याची गरज नाही. भाजपाध्यक्षांचा कार्यक्रम पाहूनच ते शिकलं जाऊ शकतं. घामाचा एक सुगंध असतो, त्याच सुगंधाने कमळ फुलवलं जाऊ शकतं,'' असं म्हणत मोदींनी अमित शाहांचंही अभिनंदन केलं. कर्नाटकात भाजप मोठा पक्ष, मात्र सत्तेचा पेच अत्यंत रंगतदार परिस्थितीनंतर कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 जाहीर झाला. कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. कर्नाटक विधानसभेच्या 224 पैकी 222 जागांसाठी मतदान झालं होतं. यामध्ये भाजपने सर्वाधिक 104 जागा मिळवल्या होत्या. मात्र तांत्रिक घोळामुळे एका जागेचा निकाल रद्द करण्यात आला. पण पुन्हा त्याबाबतची खातरजमा केल्यानंतर, भाजपने जिंकलेली ही जागा त्यांच्याच पारड्यात पडली. भाजपच्या कर्नाटकातील हुबळी-धारवाडच्या विजयी उमेदवाराचा निकाल रद्दबातल करण्यात आला होता. मतमोजणीनुसार जगदीश शेट्टार हे भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. मात्र, ईव्हीएम आणि व्हिव्हीपॅटमधील तांत्रिक बिघाडामुळे निवडणूक आयोगानं हा निकाल रद्द करत राखून ठेवला होता. अखेरी मध्यरात्री जगदीश शेट्टार यांनाच विजयी घोषित करण्यात आलं. त्यामुळे भाजपचं संख्याबळ 104 झालं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018