H3N2 Flu Precation : देशात व्हायरल फ्लूच्या (Viral Flu) रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. H3N2 इन्फ्लुएंझामुळे (H3N2 Influenza) रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य तज्ज्ञांकडून फ्लू वॅक्सिन घेण्याचं आवाहन केलं जात आहे. दिल्ली एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Randeep Guleria) यांनी नागरिकांना घाबरुन न जाता योग्य काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. डॉ. रणदिप गुलेरिया यांनी H3N2 इन्फ्लुएंझापासून बचाव करण्यासाठी कोविड उपायांचा अबलंब करण्यास सांगितलं आहे. मास्क, लस आणि सॅनिटायझेशन ही त्रिसूत्री वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.    


H3N2 इन्फ्लुएंझाचा वाढता संसर्ग


H3N2 हा व्हायरल फ्लू असून हा विषाणू H1N1 विषाणूचं म्युटेशन म्हणजे बदलेला प्रकार आहे. व्हायरल H3N2 इन्फ्लूएंझामुळे देशात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटक आणि हरियाणामध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे. डॉ. रणदीप गुलेरिया यांनी राष्ट्रीय कोविड टास्क फोर्सचे नेतृत्व केले. त्यांनी सांगितलं की, नागरिक कोविड उपायांचं पालन करु आणि लसीकरण करु शकतात. नागपूर येथे अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेस (एएमएस) तर्फे आयोजित परिषदेत डॉ.रणदीप गुलेरिया यांनी ही माहिती दिली आहे.


मास्क वापरणं पुन्हा अनिवार्य?


डॉ. गुलेरिया म्हणाले की, मास्क वापरण्याची गरज आहे, कोविडप्रमाणे पसरणारा संसर्ग आहे. हा संसर्ग खोकल्याद्वारे पसरतो. म्हणूनच आपण मास्क वापरावा, हात नियमित धुवावेत आणि सामाजिक अंतर पाळलं पाहिजे. मधुमेह तसेच गंभीर आजाराच्या रुग्णांनी जास्त काळजी घेणं आवश्यक आहे, कारण त्यांना संसर्गाचा धोका जास्त आहे.


लसीकरणावर भर देणं आवश्यक


डॉ. गुलेरिया म्हणाले की, दुसरा पर्याय म्हणजे उच्च जोखीम असणाऱ्या रुग्णांना वेगळं ठेवणं. वृद्ध आणि इतर आजारी लोकांना वेगळं ठेवून त्यांच्यावर उपचार आणि त्यांचं निरीक्षण करणे गरजेचं आहे. तसेच फ्लूवरील लस घेणं हा एक उपाय आहे. इन्फ्लूएंझा जॅब दरवर्षी नवीन लसीच्या स्वरुपात येतो आणि या लसीमध्ये इन्फ्लूएंझा ए आणि बी आणि त्यांचे उपप्रकार देखील समाविष्ट आहेत.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


H3N2 Virus : कोरोनानंतर आता H3N2 चं तांडव? दोन जणांचा मृत्यू, केंद्र सरकारने बोलावली महत्त्वाची बैठक