Gyanvapi mosque case : वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या मुद्यावर आज वाराणसी कोर्टात मोठी घडामोड झाली. वाराणसी कोर्टाने कोर्टाने कोर्ट कमिशनर अजय कुमार मिश्रा यांना सर्वेक्षण समितीमधून हटवले आहे. तर, इतर दोन कोर्ट कमिशरांना अहवाल सादर करण्यास आणखी दोन दिवसांची मुदत दिली आहे. कथित शिवलिंगाभोवती असलेले बांधकाम तोडण्याच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे.
ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी याआधी मंदीर होते असा दावा करत काही हिंदुत्ववादी संघटनांनी कोर्टात मशिद परिसराच्या सर्वेक्षणाची मागणी केली होती. त्यानंतर मशीद परिसराचे सर्वेक्षण करण्यात आले. कोर्ट कमिशनर अजय मिश्रा यांनी सर्वेक्षणातील माहिती माध्यमांसमोर उघड केली. त्यामुळे कोर्टाच्या अहवाल गोपीनयतेचा भंग झाला असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर सायंकाळी झालेल्या सुनावणीत कोर्टाने मिश्रा यांना हटवले.
वाराणसी कोर्टात ज्ञानवापी मशिदीशी निगडीत तीन याचिकांवर सुनावणी करण्यात आली. दुपारी झालेल्या सुनावणी दरम्यान सर्वेक्षण वाढवण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने करण्यात आली. तर, मुस्लिम पक्षकारांनी सर्वेक्षण करण्याच्या मुद्यावर कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने या सर्वेक्षणाबाबत दुसरी बाजू न ऐकता एकतर्फी बाजूने निर्णय दिला असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
याचिकाकर्त्या सीता साहू, मीनू व्यास आणि रेखा पाठक यांनी कथित शिवलिंगच्या चारही बाजूने असलेले बांधकाम, भिंत हटवण्याची मागणी केली होती. दावा करण्यात आलेल्या शिवलिंगाला सिमेंट आणि दगड जोडण्यात आले असल्याचा संशय याचिकाकर्त्यांनी व्यक्त केला होता.
त्याशिवाय, ज्ञानवापी मशिदीच्या पश्चिम बाजूच्या भिंतीत असलेला एक दरवाजादेखील खोलण्याची मागणी केली आहे. हा दरवाजा मा श्रृगांर गौरीच्या दिशेने जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. पूर्व दरवाजा उघडून प्रवेश द्यावा, जेणेकरून शिवलिंगापर्यंत पोहचता येईल असेही याचिकाकर्त्यांनी कोर्टात म्हटले होते.
दरम्यान, ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाच्या तिसऱ्या दिवशी शिवलिंग आढळल्याचा दावा करण्यात आला होता. याबाबतचे काही छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तर, संबंधित वास्तू शिवलिंग नसून कारंजाचा भाग असल्याचा दावा काहींनी केला होता. या भागाजवळ नमाज अदा करण्यापूर्वी हातपाय धुण्याची व्यवस्था आहे.