Gyanvapi Masjid Survey : वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सर्वेक्षणाला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने हे प्रकरण न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर मांडण्यात यावे, असे आदेश दिले आहेत. मात्र, पुढील सुनावणी कधी होणार हे आदेशात स्पष्ट केले नाही.
वाराणसीच्या ज्ञानवापी श्रींगार गौरी संकुलातील ज्ञानवापी मशिदीच्या आत व्हिडिओग्राफी सर्वेक्षणाचे काम शनिवारी सुरु होणार आहे. या संदर्भात सर्व संबंधित पक्षांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा दंडाधिकारी कौशल राज शर्मा यांनी शुक्रवारी सांगितले. मुस्लीम पक्षाने स्थानिक न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. शुक्रवारी सर्व संबंधित पक्षकारांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली असून, न्यायालयाने स्थापन केलेल्या आयोगाच्या कामात सर्वांनी सर्वतोपरी सहकार्य करावे व कायदा व सुव्यवस्था राखावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. या बैठकीला मुस्लिम पक्षाचे वकीलही उपस्थित होते.
दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश रविकुमार दिवाकर यांनी मुस्लीम पक्षाचा आक्षेप फेटाळताना ज्ञानवापी मशिदीच्या आत सर्वेक्षण करण्याचा आणि या कामासाठी नियुक्त केलेले वकील आयुक्त अजय मिश्रा यांना न हटवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, ज्ञानवापी मशिदीची देखभाल करणाऱ्या संस्थेचे सहसचिव सय्यद मोहम्मद यासीन यांनी सांगितले की, आम्ही दिवाणी न्यायाधीश रवीकुमार दिवाकर यांच्या कोर्टाने दिलेल्या आदेशाला गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यावर कोणताही आदेश देण्यापूर्वी ते सर्व फाईल्स तपासून पाहतील, असे त्यांनी सांगितले.
वाराणसी येथील स्थानिक न्यायालयाने अजय मिश्रा, अजय सिंग आणि विशाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सर्व गोष्टींचा विचार करुन निर्णय घेऊ, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यात यावी, असे आवाहन याचिकेत करण्यात आले आहे. स्थानिक न्यायालयाने दिलेले सर्वेक्षणाचे आदेश तत्काळ थांबवावेत, असे याचिकमध्ये म्हटले होते.
ज्ञानवापी मशिदीचा नवा वाद जुन्या वादापेक्षा वेगळा आहे. नवा वाद मशिदीच्या आवारातील शृंगार गौरी आणि इतर देवतांच्या दैनंदिन पूजेच्या अधिकाराबाबत आहे. ज्ञानवापी मशिदीचा नवीन वाद 18 ऑगस्ट 2021 रोजी सुरु झाला आहे. यावेळी वाराणसीच्या पाच महिलांनी शृंगार गौरी मंदिरात दररोज पूजा करण्याची मागणी करत न्यायालयात धाव घेतली होती. परंपरेनुसार या ठिकाणी वर्षातून दोनदाच पूजा केली जात असे. मात्र आता मशिदीच्या आवारातील इतर देवतांच्या दैनंदिन पूजेला अडथळा येऊ नये, अशी या महिलांची मागणी आहे.
महत्त्वाच्या बातम्या: